मुंबई ः कोकण कप मोफत राज्यस्तरीय सुपर लीग शालेय कॅरम स्पर्धा २२ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान सहा टप्प्यांमध्ये पूर्णपणे मोफत आयोजित केल्याबद्दल कोकण विभागातील शालेय कॅरम खेळाडूंच्या शिक्षक-पालक वर्गाने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आणि आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टचे क्रीडा प्रमुख प्रमोद पार्टे यांचा विशेष गौरव समारोप प्रसंगी क्रीडा संघटक विष्णू तांडेल यांच्या हस्ते करण्यात आला.
शालेय कॅरम खेळाडूंना गेले दशकभर मार्गदर्शनासह अनेक विनाशुल्क दर्जेदार कॅरम स्पर्धांचे उपक्रम आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत मोफत साकारल्यामुळे आमचे पाल्य डीएसओ स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविण्यात यशस्वी झाल्याचे पालक-शिक्षक वर्गाने सांगितले.
नुकत्याच झालेल्या कोकण कप मोफत राज्यस्तरीय सुपर लीग शालेय कॅरम स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २१८ शालेय मुलामुलींनी भाग घेऊन सहा टप्प्यांमध्ये संपन्न झाली.
को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत एकूण ६० पुरस्कारांमधील प्रतिष्ठेचा कोकण कप न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतने जिंकला. स्पर्धात्मक खेळाच्या दर्जेदार सरावामुळे खेळाडूंचा प्रत्येक सामन्यागणिक कौशल्याचा स्तर उंचावत होता. परिणामी त्यांचा कॅरम-कौशल्य आत्मसात करण्याचा पाया मजबूत होताना दिसला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी कार्यरत होते.


