 
            मुंबई ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलसमोर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलने आव्हान उभे केले आहे. सध्या राज्यातील क्रीडा विश्वात या निवडणुकीची मोठी उत्सुकता लागलेली आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीत २१ उमेदवार अजित पवार गटाचे असून त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मुंबईत २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनलची घोषणा माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी केली आहे. मतदार ३१ संघटनांपैकी २५ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे उमेदवार
अध्यक्ष ः अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष ः अशोक पंडित, उपाध्यक्ष ः आदिल सुमारीवाला (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष ः प्रदीप गंधे (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष ः प्रशांत देशपांडे (बिनविरोध निवड), सचिव ः नामदेव शिरगावकर, सहसचिव ः चंद्रजीत जाधव, सहसचिव ः उदय डोंगरे, सहसचिव ः मनोज भोरे, सहसचिव ः निलेश जगताप, खजिनदार ः स्मिता शिरोळे.
कार्यकारिणी सदस्य ः संदीप चौधरी, संदीप ओंबासे, राजेंद्र निंबायते, गिरीश फडणीस, रणधीरसिंग, किरण चौगुले, समीर मुणगेकर, संजय वळवी, सोपान कटके.
ऑलिम्पिक पॅनेलचे
१७ पैकी अधिक संघटनेचे उमेदवार सल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय निश्चित असल्याचे माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी सांगितले आहे. आधीच उपाध्यक्ष पदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे व प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विजयी उमेदवार आंतराष्ट्रीय बॅडमिंटपपटू प्रदीप गंधे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे आहे. अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे एमओएच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय साकार होत आहे. यामुळेच निवडणुकीत अजित पवार गटाला संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतील २५ पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी पवार म्हणाले की, “खेळीमेळीत होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सज्ज झालो आहोत. बिनविरोध निवड झालेल्या तीनही उपाध्यक्षांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे”.



