- मानसी मकरंद जोशी, छत्रपती संभाजीनगर.

संत ज्ञानेश्वर – 1
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ याचा प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व सामान्यांनी अनुभवला. ज्यांचं हृदय मातेसमान, लोण्यासारखे मऊ-मृदू व मन आभाळासारखं विशाल होतं म्हणून ते सगळ्यांची सर्वार्थाने माऊली झाले.
तेराव्या शतकात पैठण तालुक्यातील आपेगाव येथे ई स १२७५ मध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठल पंत व रुक्मिणी बाई हे त्यांचे थोर माता पिता. विठ्ठलपंत संस्कृत अभ्यासक व धार्मिक मनाचे होते. ते मुळात विरक्त संन्यासी होते. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची तीन भावंडे. लहान वयातच त्यांना आई-वडिलांकडून ब्रह्म विद्येचे बाळकडू व उत्तम संस्कार मिळाले.
त्यांचे बालपण संन्यासाची मुलं म्हणून शास्त्री पंडितांनी बहिष्कार टाकल्याने अतिशय कष्टप्रद व वेदनादायी गेले. याचे कारण म्हणजे त्यांच्या आई-वडिलांना प्रायश्चित म्हणून प्राणाची आहुती द्यावी लागली. या विलक्षण बुद्धिमान भावंडांना संन्यासाची मुले म्हणून समाजाची अवहेलना व हेटाळणी सहन करावी लागली. त्यांच्या मुंजीही नाकारण्यात आल्या. तेव्हा ही विद्वान, प्रतिभवान भावंडे पैठणहून आळंदीकडे निघाली. पुढे थोरले बंधू निवृत्तीनाथांना गुरू करून ज्ञानदेवांनी आपला अध्यात्मिक प्रवास सुरू केला. अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थ दीपिका (ज्ञानेश्वरी) लिहिली. म्हणजेच गीतेचा (मराठी) प्राकृत भाषेत अनुवाद असलेला हा ग्रंथ. ‘अमृतानुभव’ चांगदेव पासष्टी, हरी पाठाचे अभंग अशा विश्व कल्याण करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. त्यांचं साहित्य म्हणजे आत्मानुभवाचा सागरच आहे.
आत्मशक्तीचा वापर करून असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसांमध्ये आहे हे त्यांनी केलेल्या अनेक प्रयोगातून सिद्ध करून दाखवले. जे पिंडी ते ब्रम्हांडी हे मान्य करून या विश्वातील मानवाचे स्थान काय आहे ? ती शक्ती कुठे आहे ? याचा आत्मशोध घेण्यासाठी जप, तप, ध्यान-धारणा ही तंत्र त्यांनी शोधून काढली. इथूनच खरं योगविद्येचा पाया रचला गेला व योगशास्त्राचा आरंभ झाला. अनेक वर्षांपूर्वी ज्ञानदेवांनी ध्यान धारणेचे महत्व सांगितले.
अष्टांग योगातल्या आठ पायऱ्यांपैकी ध्यान-धारणा या महत्त्वाच्या पायऱ्या. ध्यान – आपोआप विचारांच्या अशांततेला शांत करते . सकारात्मक स्वसंवाद आणि स्पष्ट ध्येयनिश्चिती मनाला भटकण्यापासून वाचवते. खेळाडूंच्या मनात स्पर्धेपूर्वी अनेक संदेह व नाना विचार असतात. त्यामुळे ध्यानाचा त्यांच्या लक्षपूर्तीसाठी चांगला उपयोग होतो. खेळ सादर करताना मन संतुलित असण्याची नितांत गरज असते. ध्यान केल्याने ध्येय गाठण्याची चिकाटी वाढते. खेळाडूंना भावनिक स्थिरता येते. ज्याने आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
धारणा म्हणजे मनाची एकाग्रता. जी खेळाडूंना त्यांचा खेळ सादरीकरणात अत्यंत आवश्यक असते . त्यासाठी साधना (सराव) महत्त्वाची ठरते. साधना म्हणजे सतत प्रयत्न करणे आणि हेच यशाचे रहस्य आहे. खेळाडू देखील सकाळी लवकर उठतो कठोर सराव करतो आणि आपल्या खेळात यश मिळवण्यासाठी मेहनत करतो ही पण एक साधनाच आहे . पुनरावृत्ती व सरावाचे रूपांतर असाधारण कौशल्यात होते. मग तो गायनाचा रियाज असो वा खेळाचा कसून केलेला सराव. प्रत्यक्षात लक्ष केंद्रित करणे आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपली सर्व ऊर्जा केंद्रित करणे म्हणजेच खेळातील धारणा.
ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षांपूर्वी शोधलेले ध्यान, धारणा, जपा, तपाचे तंत्र आपल्या जीवनात समावेश केले तर नक्कीच यशाचे शिखर गाठता येईल. पुढच्या लेखात त्यांनी सांगितलेला ज्ञानमार्ग कसा खेळाडूंसाठी उपयोगी ठरेल ते बघूया.



