एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडून विजेत्या संघाला ४० लाखांचे बक्षीस जाहीर
सुरत ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिनियर महिला टी २० ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने मध्य प्रदेश संघाचा १२ धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकावले. या विजेतेपदामुळे महाराष्ट्र संघाला ४० लाखांचे रोख पारितोषिक मिळाले. त्यानंतर एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी विजेत्या संघाला एमसीए संघटनेकडून ४० लाखांचे बक्षीस जाहीर केले.
लालभाई कॉन्ट्रक्टर स्टेडियमवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करत १४ षटकात नऊ बाद १०२ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाला १४ षटकात नऊ बाद ९० धावा करता आल्या. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अचूक व प्रभावी गोलदांजी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात खराब झाली. किरण नवगिरे अवघ्या पाच धावांवर बाद झाली. गौतमी नाईक हिने १७ चेंडूत १७ धावा काढल्या. त्यात तिने चार चौकार मारले. तेजल हसबनीस हिने २४ चेंडूत ३० धावांची आक्रमक खेळी साकारत डावाला आकार दिला. तिने तीन चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर कर्णधार अनुजा पाटील (१२), श्वेता माने (२१), मुक्ता मगरे (४), भक्ती मिरजकर (१), एस एस शिंदे (नाबाद ६) यांनी आपापले योगदान दिले. मध्य प्रदेश संघाकडून सुची उपाध्याय हिने २० धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला.
मध्य प्रदेश संघासमोर विजयासाठी १०३ धावांचे आव्हान होते. जिन्सी जॉर्ज (२६) व अनुष्का शर्मा (२०) या सलामी जोडीने डावाची सुरुवात दणक्यात केली. परंतु, भक्ती मिरजकर व इशिता खळे यांनी या सलामी जोडीला बाद करुन संघाला मोठे यश मिळवून दिले.
आयुषी शुक्ल (५), सौम्या तिवारी (१७), संस्कृती गुप्ता (१), अनन्या दुबे (९), निकिता सिंग (०), राहिला फिरदौस (४), प्रियंका (२), वैष्णवी शर्मा (नाबाद ५) यांना लवकर बाद करुन महाराष्ट्राने चुरशीचा सामना १२ धावांनी जिंकून विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र संघाकडून इशिता खळे (३-१७), भक्ती मिरजकर (३-१९), अनुजा पाटील (१-२१), मुक्ता मगरे (१-१५) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.
एमसीएकडून ४० लाखांचे बक्षीस
या शानदार विजेतेपदाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, सचिव कमलेश पिसाळ, अपेक्स परिषदेचे चेअरमन सचिन मुळे, राजू काणे आदींनी संघाचे अभिनंदन केले आहे. पुण्यात अपेक्स परिषद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष रोहित पवार यांनी विजेत्या संघाला ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. विजेतेपद पटकावल्याबद्दल बीसीसीआयकडून महाराष्ट्र संघाला ४० लाखांचे रोख पारितोषिक मिळाले आहेत. रोहित पवार यांच्या घोषणेमुळे आता संघाला ८० लाख रुपये मिळणार आहेत. हे विजेतेपद नक्कीच या रकमेपेक्षा खूप मोठा आहे. संघाचे यश पैशांत नक्कीच मोजता येणार नाही. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी व संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या अथक परिश्रमाचे ही फळ आहे.



