क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अनुष्काचे केले कौतुक
छत्रपती संभाजीनगर ः जम्मू-कश्मीर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरची अनुष्का जैन हिने जबरदस्त कामगिरी सादर करत महाराष्ट्राला देशात गौरवाचे दुसरे स्थान मिळवून दिले.
-४५ किलो वजनी गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अनुष्काने गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड यांसह अंतिम सामन्यात राजस्थानच्या खेळाडूचा पराभव करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे अनुष्का जैनशी संवाद साधत अभिनंदन केले.अनुष्का जैन ही छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील रिव्हरडेल हायस्कूलची विद्यार्थीनी असून, तिच्या या पराक्रमामुळे राष्ट्रीय मुलींच्या पदक तालिकेत महाराष्ट्राने द्वितीय स्थान पटकावले. या स्पर्धेत एकूण २५ राज्यांनी सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्राच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
मुलींच्या गटात शर्वरी राठोड (छत्रपती संभाजीनगर) हिने -६० किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. सेजल तायडे (छत्रती संभाजीनगर) हिने -६५ किलो वजन गटात कांस्य पदकाची कमाई केली. झवेरिया शेख (वर्धा) हिने – ५३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. समृद्धी बागड (धुळे) हिने -७० किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले. मुलांच्या गटात दिव्यांशू कठेत (पुणे) याने -६५ किलो वजन गटात रौप्य पदक आणि पार्थ तांबरे याने -६५ किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले.
‘मिशन लक्षवेध’चा खेळाडूंना मोठा फायदा
खेळाडूंच्या या झंझावाती यशामागे महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ या योजनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे विशेषत्वाने नमूद करण्यात आले. या योजनेमुळे राज्यातील गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण, सुविधा व तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे.
मान्यवरांचे अभिनंदन
अनुष्का सहित सर्व पदक विजेत्या खेळाडूंना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, ‘मिशन लक्षवेध’ कार्यासन प्रमुख संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जळगावचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, ऑल महाराष्ट्र वूशू संघटनेचे सचिव सोपान कटके, जिल्हा संघटनेचे सचिव महेश इंदापुरे यांनी अभिनंदन केले.
तसेच मुख्य प्रशिक्षक महेश इंदापुरे, सुरेश जाधव, लता कलवार, सुमित खरात, संघ व्यवस्थापक मीनल थोरात, राष्ट्रीय पंच बंटी राठोड, तसेच ‘मिशन लक्षवेध’चे आदित्य अन्वीकर, जागृती गरुड, ओमकार जोहरी व सौम्या ज्योती डे यांनी कौतुकाचा वर्षाव केला.



