नांदेड : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत हिंगोली जिल्हा संघटनेतर्फे आयोजित २४ वी राज्यस्तर सब-ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान हिंगोली येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आर्चरी स्कूल, श्री गुरु गोबिंदसिंह स्टेडियम, नांदेड येथे करण्यात आले आहे, अशी माहिती संघटना सचिव व प्रशिक्षिका वृषाली पाटील-जोगदंड यांनी दिली.
निवड चाचणीमध्ये इंडियन, रिकर्व आणि कंपाऊंड प्रकारांसाठी मुला-मुलींची संघ रचना करण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००८ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. निर्धारित अंतरांनुसार स्पर्धा घेण्यात येणार असून ड्रेस कोड तसेच भारतीय आर्चरी संघटनेतील नोंदणी अनिवार्य आहे.
इच्छुक खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह क्रीडा गणवेशात उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ हंसराज वैद्य, श्रीनिवास भुसेवार, मुन्ना कदम कोंडेकर, सुरेश तमलुरकर, शिवाजी पुजरवाड, मालोजी कांबळे व राष्ट्रपाल नरवाडे यांनी केले.


