सुवर्णयुग….शफाली–दीप्तीचा अष्टपैलू महापराक्रम, दक्षिण आफ्रिका संघाचा ५२ धावांनी पराभव
नवी मुंबई ः शफाली वर्मा (८७ आणि २-३६) व दीप्ती शर्मा (५८ आणि ५-३९) यांच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने महिला विश्वचषक पहिल्यांदा जिंकला. तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ५२ धावांनी नमवले आणि ऐतिहासिक विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केले.
शफालीची अष्टपैलू कामगिरी
पावसामुळे सुमारे दोन तास उशिरा सुरू झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी शतकी भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. तथापि, संघाच्या उर्वरित फलंदाजांना याचा फायदा घेण्यात अपयश आले आणि मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य असलेल्या संघाला सात बाद २९८ धावांवर समाधान मानावे लागले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषक अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मानधना आणि शफालीने पाया रचला
भारताने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधना (४५) आणि शफाली वर्मा (८७) यांनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची शतकी भागीदारी करून संघाला भक्कम पाया रचला. शेफालीने आक्रमक खेळी केली, जलद ८७ धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता, तर मानधना ५८ चेंडूत आठ चौकारांसह संयमी खेळी करत होती.
मधली फळी गडगडली
तथापि, मधल्या फळीला या दमदार सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. जेमिमा रॉड्रिग्ज (२४), हरमनप्रीत कौर (२०) आणि अमनजोत कौर (१२) त्यांच्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरल्या. परिणामी, भारत ३५० च्या संभाव्य धावसंख्येवरून ३०० च्या खाली घसरला.

दीप्ती शर्मा (नाबाद ५८) आणि रिचा घोष (३४) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. दीप्तीने तिचे १८ वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटपर्यंत ती टिकवून ठेवली. दक्षिण आफ्रिकेसाठी अयाबोंगा खाका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने तीन बळी घेतले. म्लाबा, डी क्लार्क आणि क्लोई ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
वरच्या फळीत स्थिरतेचा अभाव
२९८ धावांचे लक्ष्य हे छोटेसे यश नसले तरी, महिला विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. तथापि, भारतीय संघाच्या फलंदाजी चार्टवरून स्पष्टपणे दिसून आले की वरच्या फळीत संघाला स्थिरतेचा अभाव होता. जर मधल्या फळीने थोडी अधिक जबाबदारी दाखवली असती तर भारत ३२०-३३० धावांचा टप्पा ओलांडू शकला असता.
आता, सर्व दबाव गोलंदाजांवर असेल, ज्यांना या धावसंख्येचा बचाव करून इतिहास घडवण्याची संधी असेल. दक्षिण आफ्रिकेला विजेतेपद जिंकण्यासाठी विक्रमी धावसंख्या उभारावी लागेल, कारण मागील कोणत्याही महिला विश्वचषक अंतिम सामन्यात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही.
वोल्वार्डचे सलग दुसरे शतक
पहिल्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान होते. कर्णधार लॉरा वोल्वार्ड व ताझमीन ब्रिट्स या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करुन देत ५१ धावांची भागीदारी केली. ही जमलेली जोडी अमनजोत कौर हिने ब्रिट्सला धावबाद करुन फोडली. तिने २३ धावा काढल्या. त्यानंतर अॅनेके बॉश (०) श्री चरणीची बळी ठरली.
एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना लॉरा वोल्वार्ड हिने धावफलक हलता ठेवण्याचे काम चोखपणे केले. मॅरिझॅन कॅप (४) लवकर बाद झाली. शफाली वर्मा हिने तिला बाद करुन संघाला दुसरे मोठे यश मिळवून दिले. तत्पूर्वी, शफालीने सुने लुस हिला २५ धावांवर बाद करुन सामन्यातील रंगत कायम ठेवली.
दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी
लॉरा वोल्वार्ड व सिनालो जाफ्ता ही जोडी धोकादायक बनत असताना दीप्ती शर्मा हिने तिला १६ धावांवर बाद केले. त्यानंतर दीप्ती शर्माने डर्कसेनला ३५ धावांवर तंबूत पाठवले. तिने दोन षटकार व एक चौकार मारला. त्यानंतर दीप्ती शर्माने सामन्यातील तिसरी विकेट घेताना शतकवीर लॉरा वोल्वार्डला बाद केले. तिने ९८ चेंडूत १०० धावांची दमदार खेळी केली. तिने ११ चौकार व १ षटकार मारला. अमनजोत कौर हिने सीमारेषेवर एका हाताने शानदार झेल घेऊन संघाला सर्वात मोठे यश मिळवून दिले. अमनजोतचा हा झेल या सामन्यातील सर्वात प्रेक्षणीय आणि लक्षवेधक ठरला. वोल्वार्ड बाद झाल्यानंतर आफ्रिका संघ प्रचंड दबावात आला. त्याचा फायदा उठवत दीप्तीने त्याच षटकात चौथा बळी मिळवला. दीप्तीने क्लो ट्रायॉनला (१) पायचीत बाद करुन विजयाचा मार्ग सुकर बनवला. त्यानंतर दीप्तीने खाका हिला धावबाद केले. दीप्तीने नॅडिन डी क्लार्कला १८ धावांवर बाद केले आणि भारतीय खेळाडूंनी विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा केला. हरमनप्रीतने अप्रतिम झेल घेऊन विजयाचा आनंद अधिक द्विगुणित केला. दीप्ती शर्माने ३९ धावांत पाच विकेट घेऊन भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. श्री चरणी (१-४८), शफाली वर्मा (२-३६) यांनी विकेट घेऊन संघाला जेतेपद मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकात २४६ धावांवर संपुष्टात आला.



