गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धा
पुणे ः गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरू तेगबहादुर स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित २४व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत महिला गटात क्रीडा प्रबोधिनी अ संघाने विजेतेपद संपादन केले. गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३५० फुगे सोडून स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
ऍम्युनिशन फॅक्टरी स्पोर्ट्स मैदान, खडकी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीत क्रीडा प्रबोधिनी अ संघाने सडन डेथमध्ये इग्नाइट एफसी संघाचा ७-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत क्रीडा प्रबोधिनी अ संघाकडून सुमैया शेख आणि दिव्या बस्तानी यांनी प्रत्येकी एक गोल केला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये खेळवण्यात आला.
टायब्रेकरमध्ये क्रीडा प्रबोधिनीकडून आर्या चौधरे, साक्षी हिवाळे, पूर्वा गायकवाड, साक्षी इंगळे, दिव्या पावरा यांनी गोल केले. तर, इग्नाइट एफसीकडून श्वेता मालनगवे, सुहासिनी उपलांची, संजवी ओसवाल, स्वरांगी रेड्डी, तारु यादव यांनी गोल केले. टायब्रेकरमध्ये देखील ५-५ अशी बरोबरी झाल्याने सडन डेथ प्रकाराचा अवलंब करण्यात आला. सडन डेथमध्ये क्रीडा प्रबोधिनीकडून तन्वी कोरेने गोल केला. पराभूत संघाकडून देवेश्री भागता हिला गोल करण्यात अपयश आले.
स्पर्धेतील विजेत्या क्रीडा प्रबोधिनी अ संघाला करंडक व पाच हजार रुपये, तर उपविजेत्या इग्नाइट एफसी संघाला करंडक व तीन हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ राजेश अगरवाल, पीआयडी नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल पीडीजी पीएमजेएफ अभय शास्त्री, माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, पूना डिस्ट्रिक्ट गुरुद्वारा असोसिएशनचे अध्यक्ष सरदार संतसिंग मोखा, गुरुद्वारा गुरुनानक दरबार पुणे कॅम्पचे अध्यक्ष चरणजीत सहानी, गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस एस अहलुवालिया आणि एमजेएफ लायन रानी अहलूवालीया, गुरुद्वारा देहूरोडचे अध्यक्ष गुरुमीत सिंग रत्तू, पंजाबी कला केंद्राचे अध्यक्ष सरदार रजिंदर सिंग वालिया आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सर्वोत्कृष्ट खेळाडू : सुमैया शेख (क्रीडा प्रबोधिनी अ)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : सुहासिनी उपलांची



