अंबाजोगाई : “प्रत्येक व्यक्तीमध्ये एक खेळाडू दडलेला असतो; केवळ त्यातील कौशल्याची पातळी कमी–जास्त असते,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे यांनी केले. छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलच्या मैदानावर आयोजित “स्पोर्ट्स मीट – क्रीडा महोत्सव” चे उद्घाटन त्यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाशिक्षक प्रविण ठोंबरे व मुख्याध्यापक गणेश राठोड उपस्थित होते.
उद्घाटनाप्रसंगी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात क्रीडा संचलनाने महोत्सवाची रंगत वाढवली.
मुख्य अतिथी शिवकुमार निर्मळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी रोज किमान २४ मिनिटे व्यायाम करून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबर खेळ खेळणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.”
क्रीडा शिक्षक प्रविण ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, क्रीडा शिस्त, टीमवर्क आणि सहनशीलता शिकवते. प्राचार्य अरुण पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निरोगी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना मुंडे आणि इशरत मोमीन यांनी रंगतदारपणे केले. उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर प्राचार्य अरुण पवार यांनी आभार मानले.
क्रीडा शिक्षक अमर नरवाडे, अर्चना लोंढाळ, सुजाता गाढवे तसेच इतर शिक्षकांच्या सहकार्याने विविध क्रीडा स्पर्धांची उत्साहात सुरुवात झाली. विद्यार्थी व पालकांच्या प्रतिसादामुळे परिसरात क्रीडा महोत्सवाला मोठी रंगत लाभली.



