छत्रपती संभाजीनगर : शहरातील उदयोन्मुख बॉक्सर ओवी अभिजीत अदवंत हिने ६९व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत (१७ वर्षांखालील मुली) सुवर्ण पदक पटकावून छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला आहे. ही स्पर्धा इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे झाली.

विशेष म्हणजे, केवळ १३ वर्षे १० महिन्यांची असलेल्या ओवी अदवंत हिने स्वतःपेक्षा वयाने मोठ्या प्रतिस्पर्ध्यांशी लढत १७ वर्षांखालील गटात सहभाग घेत उल्लेखनीय वर्चस्व प्रस्थापित केले. विद्या भारती संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने पाचही सामन्यांत दमदार विजय मिळवला.
स्पर्धेत सलग विजय
ओवी अदवंत हिने या स्पर्धेत दिशा शर्मा (राजस्थान) ४-१, गोदावरी राठोड (उत्तराखंड) ५-०, प्रियांजली (दिल्ली) ५-० यांचा असा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत ओवीने नयना यहवी (कर्नाटक) हिचा ४-१ असा सहज पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मानवी (हरियाणा) हिला ओवीने ४-१ असे नमवत सुवर्णपदक जिंकले.
ओवीला मूलभूत प्रशिक्षण अजय जाधव यांच्याकडून मिळाले असून स्पर्धेदरम्यान संदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. ती साई एनसीओई छत्रपती संभाजीनगर येथे वर्षा त्रिपाठी, सोनू टाक आणि पंकज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
छत्रपती संभाजीनगर सिटी बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत जोशी व सचिव पंकज भारसाखळे यांनी ओवीचे अभिनंदन करत तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ऑगस्ट महिन्यात ओवी अदवंत हिने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पटकावले होते. तिची सातत्यपूर्ण कामगिरी भविष्यातील आंतरराष्ट्रीय यशाची चाहूल देत आहे.



