गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, अनिलकुमार सकदेव यांची आकस्मिक भेट
छत्रपती संभाजीनगर ः गंगापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव (तालुका गंगापूर) येथे आकस्मिक भेट देऊन शाळेची पाहणी केली.
भेटीदरम्यान मान्यवरांनी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, प्रशासकीय कार्यप्रणाली तसेच विद्यार्थ्यांचे सहभागपूर्ण उपक्रम यांचा आढावा घेतला. शाळेच्या परिसरात असलेली स्वच्छता, परसबाग, आकर्षक सजावट, शैक्षणिक भिंतीवरील माहिती फलक, वाचन कोपरा, विज्ञान पेटी, संगणक व डिजिटल शिक्षण साधनांचा प्रभावी वापर याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षणाच्या पद्धती, उद्दिष्टे आणि आव्हाने जाणून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उत्तरांनी व शिक्षकांच्या निष्ठावान कार्यपद्धतीने प्रभावित झाल्याचे सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव यांनी शाळेतील सामूहिक उपक्रम, विद्यार्थी प्रगती आणि शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांची कौतुकाने दखल घेतली. त्यांनी सांगितले की, ढोरेगाव शाळा इतरांसाठी आदर्श ठरेल अशी वाटचाल करत आहे. शाळेचा सर्वांगीण विकास हा टीमवर्कचा उत्तम नमुना आहे.

दोन्ही अधिकारी मंडळींनी शाळेच्या शिक्षकवर्गाचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी उत्तम शुभेच्छा दिल्या.या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अधिक प्रेरणादायी कामगिरी करण्यासाठी शिक्षकवृंद सज्ज झाला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक यांनी शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरल्याची भावना अधिकारी द्वयांनी व्यक्त केली.
केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, पदवीधर शिक्षक राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उदे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, मनोज मस्के, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा, कल्याणी जगताप यांची यावेळी उपस्थिती होती.



