डेरवण, चिपळूण : एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले.
या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील ५ जिल्हे व ३ महानगरपालिकांकडून एकूण १४२३ खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला. १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला–मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला उच्च दर्जाची रंगत आली.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या सावंत, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, क्रीडा अधिकारी सुनील कोळी, गणेश जगताप, गणेश खैरमोडे, तसेच रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, श्रीकांत पराडकर, क्रीडा शिक्षक यांसह मान्यवर उपस्थित होते.
विजय शिंदे यांनी खेळाडूंना डेरवणसारख्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाचा लाभ घेत अनुशासन, क्रीडा मूल्ये आणि उच्च ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले. “१२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत विभागातील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्तर गाठावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत धावण्याच्या विविध अंतराच्या शर्यती, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, हातोडाफेक, थाळीफेक व क्रॉसकंट्री या स्पर्धांत खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन केले. एकूण गुणतालिकेत कोल्हापूर प्रथम, सातारा द्वितीय आणि सांगली तृतीय ठरले.
संदीप तावडे यांनी “अशा स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, स्पर्धात्मकता आणि संघभावना वाढविण्यास उपयुक्त ठरतात,” असे सांगत ग्रामीण भागातील खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. विजेत्या खेळाडूंना पदके व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक स्पर्धेतील पहिला व दुसरा क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विभागाला पदकांची आशा अधिक बळावली आहे. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक खेळ बाबीतील प्रथम दोन क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंची १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.



