हिंगोली : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन आणि रेशन्स इंग्लिश स्कूल, शिरड–शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७वी राज्य वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शिरड–शहापूर येथे जल्लोषात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड हे होते. यावेळी राज्य सरचिटणीस गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, राज्य सदस्य संजय ठाकरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर गुल्हाने, प्राचार्य ललिता साखरे, जिल्हाध्यक्ष विक्रम शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते.
मुनीर पटेल म्हणाले, “टेनिस व्हॉलीबॉल हा महाराष्ट्राच्या मातीतील खेळ आहे. त्याचा प्रसार ग्रामीण पातळीवर व्हावा म्हणून प्रथमच ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. हा खेळ लवकरच राज्यात अधिक लोकप्रिय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेत हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नाशिक, अमरावती, अकोला, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, धाराशिव आदी जिल्ह्यांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दरम्यान, १३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ प्रतिनिधित्व करणार आहेत.स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव नावेद पठाण, गजानन मुळे, संदीप कदम, गौरव मुळे, अंगद जाधव, विजय जाधव, अखिलेश ठाकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातून राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत असल्याने टेनिस व्हॉलीबॉल खेळाला नवीन उभारी मिळाल्याचे क्रीडा वर्तुळात व्यक्त होत आहे.
अंतिम निकाल
पुरुष गट ः प्रथम – लातूर, द्वितीय – यवतमाळ, तृतीय – मुंबई उपनगर.
महिला गट ः प्रथम – हिंगोली, द्वितीय – परभणी, तृतीय – अकोला.
मिश्र दुहेरी गट ः प्रथम – परभणी, द्वितीय – मुंबई उपनगर, तृतीय – सांगली



