क्रीडा प्रबोधिनी संघाला सर्वसाधारण विजेतेपद 

  • By admin
  • November 4, 2025
  • 0
  • 83 Views
Spread the love

ठाणे संघ उपविजेता, ३५० युवा खेळाडूंची दमदार मेजवानी

जळगाव ः क्रीडा संस्कृती, स्पर्धेतील शिस्त, तंत्र, वेग, सहनशक्ती आणि मानसिक धैर्य यांचे दर्शन घडवणारी ५२ वी राज्यस्तरीय ज्युनिअर ज्यूदो स्पर्धा जळगावच्या क्रीडांगणात तीन दिवस रंगली आणि उत्साहात संपन्न झाली. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत, महाराष्ट्र ज्यूदो संघटना आणि जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ३५० हुनरबाज मुला–मुलींनी झुंजार लढती साकारल्या.

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेमुळे जळगाव शहरात क्रीडा स्पंदनाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील क्रीडा पायाभूत सुविधांची कक्षा वाढत असल्याचेही या आयोजनातून अधोरेखित झाले.

दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

समारोप व बक्षीस वितरण सोहळा हा तितकाच भव्य आणि प्रेरणादायी ठरला. यावेळी राज्यसभा खासदार अॅड उज्वल निकम आणि जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते जनरल विजेतेपदाचे वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर – जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ केतकी पाटील, ज्यूदो संघटनांचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा प्रबोधनीचा दबदबा कायम

तीन दिवस चाललेल्या सामन्यांत उत्कृष्ट तंत्र, कौशल्य आणि जिंकण्याची जिद्द याचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. क्रीडा प्रबोधनीने जनरल चॅम्पियनशिप पटकावून आपला दबदबा सिद्ध केला, तर उपविजेतेपद ठाणे संघाने मिळवले.
जनरल चॅम्पियनशीप क्रीडा प्रबोधनी संघाने मिळवली तर ठाणे संघ उपविजेता ठरला. मुलांच्या गटात पीडीजेए संघाने विजेतेपद तर मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधनी संघाने अजिंक्यपद मिळवले. खेळाडूंचा खेळ, संघभावना आणि स्पर्धेतील शिस्त पाहता महाराष्ट्रातील ज्यूदोचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित झाले.

संघभावनेचा उत्तम नमुना

या यशस्वी आयोजनामागे असलेल्या संघटित परिश्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. पुनीत बालन ग्रुप, जैन इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि आमदार राजू मामा भोळे यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा भव्यतेने पार पडली. निर्णायक म्हणून अमोल देसाई, दर्शना लखाने आणि विजय यादव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. आयोजनासाठी उपाध्यक्ष हर्षल चौधरी, सचिव डॉ उमेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्ते संघाने उत्कृष्ट समन्वय साधला. सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर डॉ उमेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्यूदो खेळाला नवे पंख

जळगावमध्ये अशा स्तराची स्पर्धा होणे हे शहरासाठीही अभिमानास्पद ठरले. स्पर्धा केवळ पदकापुरती मर्यादित न राहता, शिस्त, आत्मविश्वास, मानसिक ताकद आणि क्रीडा संस्कारांची जोड देणारी ठरली.अनेक पालक व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला भेट देत ज्यूदोविषयीचा दृष्टीकोन आणखी बळकट केला. राज्यातील ज्यूदो विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जळगावची ओळख अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *