मुंबई ः गोवा येथील पेडेम इनडोअर स्टेडियममध्ये नुकत्याच झालेल्या १४ व्या आशियाई अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चेंबूर येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकूण १५ पदकांची कमाई केली. त्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.
सिनियर गटात महिला दुहेरीमध्ये ऋतुजा जगदाळे, रुणल रणपिसे या जोडीने ३ सुवर्ण पदके पटकावली. युथ गटात मिश्र दुहेरी प्रकारांत काव्या कुंडे, हर्ष अग्रवाल या जोडीला ३ कांस्य पदके मिळाली. ज्युनिअर गटात मिश्र दुहेरी प्रकारांत आदित्य दिघे, सान्वी शिंदे यांनी ३ रौप्य पदकांची कमाई केली.
ज्युनिअर पुरुष गटात दीक्षांत ससाणे, अथर्व जानसकर, नमो उनियाल, अश्विन गोसावी या गटाने देखील ३ रौप्य पदके पटकावली. सिनियर पुरुष दुहेरी गटात आकाश गोसावी, आदित्य खसासे यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
सिनियर महिला गटात वैदेही मयेकर, आचल गुरव, अर्णा पाटील यांनी अनुक्रमे १ रौप्य, १ कांस्य पदक मिळवले. तसेच प्रि-युथ गटात रेवांत रणपिसे, श्लोक पडवळ, महादेव गावडे, श्लोक ठोंबरे यांनी ऊत्कृष्ट सादरीकरण करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले पर्दापण केले.
या सर्व खेळाडूंना डॉ महेंद्र चेंबूरकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक राहुल ससाणे, सुनील रणपिसे, योगेश पवार, रमेश सकट यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या १९ खेळाडूंनी या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पंच मंडळ व स्पर्धा आयोजनासाठी सोनाली बोराडे, नमन महावर, कुणाल कोठेकर यांना स्पर्धेत संधी मिळाली. पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे लोकमान्य शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खास अभिनंदन करून येणाऱ्या भावी काळासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


