ऑस्ट्रेलियन-न्यूझीलंड स्टार्स खेळाडूंना केले रिलीज
नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली असून, काही धक्कादायक निर्णयांसह महत्त्वपूर्ण बदल समोर आले आहेत. भारताच्या २०२५ विश्वचषक विजेत्या संघातील प्रमुख स्टार्सवर त्यांच्या फ्रँचायझींनी विश्वास कायम ठेवला आहे, तर अनेक मोठी परदेशी नावे मात्र रिलीज करण्यात आली आहेत.
भारतीय संघाच्या सुवर्ण यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा यांना त्यांच्या संबंधित टीमने रिटेन केले आहे. दुसरीकडे, अनुभवी ऑस्ट्रेलियन खेळाडू एलिसा हिली आणि मेग लॅनिंग, तसेच न्यूझीलंडची अष्टपैलू स्टार अमेलिया केर यांना त्यांच्या टीम्सनी रिलीज केले आहे. २०२५ विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारी ऑल-राउंडर दीप्ती शर्मा देखील रिलीज झाली आहे. हिलीच्या अनुपस्थितीत दीप्तीने गत सत्रात उत्तर प्रदेश वॉरियर्स संघाचे नेतृत्व केले होते.
रिटेन्शन आकडेवारी
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने जास्तीत जास्त ५ खेळाडू रिटेन केले आहेत. आरसीबीने ४, गुजरात जायंट्सने २, तर उत्तर प्रदेश वॉरियर्सने फक्त १ खेळाडू रिटेन केला आहे.
रिटेन्शन नियम
- प्रत्येक फ्रँचायझीला कमाल ५ खेळाडू रिटेन करता येतात (३ भारतीय + २ विदेशी).
– ५ रिटेन्शन असल्यास, किमान १ अनकॅप्ड भारतीय खेळाडू असणे बंधनकारक.
– या वर्षी प्रथमच आरटीएम कार्डची सुविधा उपलब्ध असून लिलावात माजी खेळाडू परत घेता येऊ शकतात.
– ३ किंवा ४ खेळाडू रिटेन करणाऱ्या टीमला लिलावात अतिरिक्त आरटीएम मिळेल.
पर्स स्थिती
महिला प्रीमियर लीग मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. प्रत्येक टीमकडे १५ कोटींची पर्स आहे.
– यूपी वॉरियर्स : सर्वाधिक १४.५ कोटी व ४ आरटीएम– गुजरात जायंट्स : ९ कोटी व फक्त भारतीय खेळाडूंसाठी ३ आरटीएम
– आरसीबी ः ६.२५ कोटी व १ आरटीएम– दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियनन्स : प्रत्येकी ५.७५ कोटी, आरटीएम नाही
महिला प्रीमियर लीग रिटेन्शन यादी
दिल्ली कॅपिटल्स : अॅनाबेल सदरलँड, मॅरिझान कप, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, निकी प्रसाद.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, जी. कमलिनी, हेली मॅथ्यूज.
आरसीबी स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष, श्रेयंका पाटील.
गुजरात जायंट्स : अॅशले गार्डनर, बेथ मुनी.
यूपी वॉरियर्स : श्वेता सेहरावत
रिटेन्शन लिस्टमुळे मेगा लिलावात तीव्र स्पर्धा होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.



