मुंबई ः बँक ऑफ बडोदा-बीओबी मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेमध्ये शुभ्रदिता करमरकर हिने महिला गटात तर कुलदीप वार्ष्णेय याने पुरुष गटात विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या अंतिम फेरीत बिगरमानांकित शुभ्रदिता करमरकर हिने द्वितीय मानांकित कविता राणाला नमवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेला आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकार्य लाभले होते.
वायएमसीए-ग्रँट रोड येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम मानांकित कुलदीपने अभिजित सोनावणेचे आव्हान संपुष्टात आणून अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत कुलदीपने मोहित शुक्लाचा आणि अभिजित सोनावणेने आशिष दवे याचा तर महिला गटात शुभ्रदिता करमरकर हिने मस्तूद प्रार्थना हिचा तर कविता राणाने कृतिका अग्रवालचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
पहिल्या चार क्रमांकाचे टेबल टेनिसपटू राष्ट्रीय स्तरावरील आंतर विभागीय बीओबी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.



