राष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू सौरभ माळवे यांची ‘राज्य कर निरीक्षक’ पदावर निवड
परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ गणेश माळवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ‘राज्य कर निरीक्षक’ या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवली आहे.
खेळाच्या मैदानातील शिस्त, संघर्ष आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी ही प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे.राष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबॉलमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करताना मिळवलेल्या अनुभवाद्वारे सौरभ यांनी “खेळाडू ते अधिकारी” असा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेतील अडथळ्यांवर मात करून हे यश मिळवले.

सौरभचे वडील प्रा गणेश माळवे हे क्रीडा शिक्षक असून विद्यार्थ्यांना क्रीडासंस्कार देण्याचे कार्य करतात. आई छाया माळवे गृहिणी आहेत. कुटुंबाचे पाठबळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे सौरभच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ ठरले.
मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरांतून सौरभचे अभिनंदन होत असून विद्यार्थी, पालक आणि क्रीडा क्षेत्रासाठी ते प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. त्यांच्या यशामुळे सेलू शहर, नूतन विद्यालय आणि परभणी जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. सौरभ यांनी सिद्ध केले आहे की, “खेळ जीवन घडवतो, आणि शिस्त व चिकाटी स्वप्नांची पूर्तता करतात.”


