रोटरी क्लब अंबाजोगाई सिटी उपक्रमाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक
अंबाजोगाई (मोहित परमार) ः स्वप्न पाहण्याचा अधिकार सर्वांना असतो; पण त्या स्वप्नांना पंख देणारी प्रेरणा आणि संधी मिळाली, तरच ती वास्तवात उतरतात…” या भावनेला मूर्त स्वरूप देत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीतर्फे वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील मुलींना क्रिकेट किट, टी-शर्ट आणि कॅप्सचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ६ नोव्हेंबर रोजी पार पडला.
ऊसतोड मजुरांच्या मुलींचे शिक्षण करणारी ही आश्रमशाळा केवळ शैक्षणिकच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विभागीय पातळीवर उल्लेखनीय चमक दाखवत आहे. या मुलींच्या प्रतिभेला योग्य प्रेरणा आणि संधी मिळावी, त्यांना आत्मविश्वास व धैर्याची साथ मिळावी, या हेतूने रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला.
हा उपक्रम रोटरीच्या “हॅपी स्कूल” आणि “स्पोर्ट्स प्रमोशन” या सेवायोजनांखाली आयोजित करण्यात आला असून, गोदावरिबाई कुंकुळोळ योगेश्वरी कन्या शाळा आणि माध्यमिक आश्रमशाळा या दोन शाळांमध्ये क्रिकेट साहित्य व क्रीडासाहित्य वाटपाची योजना राबवण्यात आली आहे.
कार्यक्रमात रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोहिणी अजय पाठक यांनी प्रेरणादायी संदेश देत, “स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सराव, शिस्त आणि योग्य संधीची सांगड आवश्यक आहे,” असे सांगून मुलींना प्रोत्साहित केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर, शिक्षक-शिक्षिका, क्रीडा शिक्षिका तसेच रोटरीचे धनराज सोळंकी, कल्याण काळे, अजितदादा देशमुख, रुपेश रामावत, राधेश्याम लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश रामावत यांनी केले.
किट मिळताच मुलींनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या घोषणांमधून जल्लोष करत आनंद व्यक्त केला.



