ठाणे (रोशनी खेमानी) : ठाणे महापालिका आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धा २०२५-२६ मधील मुलींची स्पर्धा ६ नोव्हेंबर रोजी लेट बाबुराव सरनायक जिम्नॅस्टिक हॉल, पोखरण रोड क्रमांक २ येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत श्री मावळी मंडळ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी देवांशी राहुल पवार हिने उत्तुंग कामगिरी करत १४ वर्षांखालील –३८ किलो गटात सुवर्णपदक पटकावले.
देवांशीची मुंबई विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे शाळेसाठी भूषणावह यश मानले जात आहे. देवांशीच्या सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि शिस्त यांचे हे फळ असल्याची भावना व्यक्त झाली.
क्रीडा मार्गदर्शक प्रमोद वाघमोडे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा मोठा वाटा असतो. देवांशीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट, प्रोत्साहन आणि पाठबळच तिच्या सुवर्णपदकाचे खरे श्रेय आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या वतीने देवांशीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, येत्या विभागीय स्पर्धेसाठी तिला यशाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



