ठाणे (समीर परब) ः ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि ठाणे जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय कराटे स्पर्धा २०२५–२६ बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक हॉल, पोखरण रोड क्रमांक २, ठाणे येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत ९२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटांत खेळाडूंनी कराटेच्या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेचे आयोजन चार रिंग्सवर करण्यात आले होते. ५९ पंच व प्रति रिंग ८ अधिकारी अशा सक्षम चमूने डब्ल्यूकेएफ नियमांनुसार स्पर्धा सुरळीत पार पाडली.
स्पर्धेला विद्यार्थी, पालक, क्रीडा शिक्षक व कराटे क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सेन्साई आनंद पेंढुरकर, बाळा साठे, हसन इस्माईल, रवी सैनी यांसह अनेक अनुभवी प्रशिक्षक आणि पंच उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, मुंबई विभाग संपर्कप्रमुख व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी भेट देऊन आयोजनाचे कौतुक केले व स्पर्धा प्रमुख सतीश पाटील आणि टीमचे अभिनंदन केले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षण, शिस्त व क्रीडा संस्कारांची प्रेरणा निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



