राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थाटात समारोप; महाराष्ट्र संघ जाहीर

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

बीड : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, बीड आणि जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय १७ वर्षांखालील मुला–मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार समारोप व बक्षीस वितरण समारंभ शनिवारी बीड येथे पार पडला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांमधील मुलांचे आठ आणि मुलींचे आठ संघ तसेच प्रत्येकी ५ मुलगे व ५ मुली निवड चाचणीसाठी सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये रंगलेल्या या सामन्यांमध्ये खेळाडूंची चुरस, सामना-वाचकांचा कौशल्यपूर्ण खेळपट्टीवरील निर्णय आणि प्रेक्षकांचा उत्साह अनुभवायला मिळाला.

समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव शकील अहमद, गोपाळ धांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना जितिन रहमान म्हणाले, “खेळ माणसाला एकाग्रता, आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण प्राप्त करून देतो. जिंकणे–हारणे हा प्रवासाचा भाग असला तरी सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटी ठेवल्यास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवता येते. पराभूत संघांनी खचून न जाता पुढील स्पर्धेसाठी नव्या जोमाने तयारी करावी.”

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून महाराष्ट्र राज्याचे मुलांचे व मुलींचे संघ घोषित करण्यात आले असून हे संघ ११ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बरेली (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात तालुका क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे, राखी यादव, कालिदास होसुरकर, अनिकेत काळे, पंच, निवड समिती, स्वयंसेवक, जिल्हा व्हॉलीबॉल संघटना व क्रीडा विभागाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी आभार मानले.

अंतिम निकाल

मुलांचा गट ः १. छत्रपती संभाजीनगर विभाग (विवेकानंद विद्यालय, काळेगाव हवेली, बीड), २. कोल्हापूर विभाग (माध्यमिक आश्रमशाळा, आष्टा, सांगली), ३. नागपूर विभाग (श्री निकेतन विद्यालय, नागपूर).

मुलींचा गट ः १. पुणे विभाग (मिलेनियम नॅशनल स्कूल अंड ज्युनियर कॉलेज, पुणे), २. लातूर विभाग (छत्रपती शिवाजी विद्यालय, धाराशिव), ३. कोल्हापूर विभाग (द्रविड हायस्कूल, वाई, सातारा).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *