राज्य कबड्डी स्पर्धा
पुणे ः मुंबई शहर पश्चिम, रत्नागिरी, नंदूरबार, लातूर व पुणे शहर या संघांनी ३६ व्या किशोर-किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत आपापल्या गटात आगेकूच सुरू ठेवली आहे.
पिंपरी चिंचवड बोपखेल येथील श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान संघ व विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात झालेल्या सामन्यात किशोरी विभागात ह गटात मुंबई शहर पश्चिम संघाने मुंबई उपनगर पूर्व संघाचा ५७-२१ असा सहज पराभव केला.
आक्रमक पवित्रा घेत मुंबई शहर पश्चिम संघाने विश्रांती पूर्वी दोन लोण देत २५-९ अशी भक्कम आघाडी घेतली. विश्रांती नंतरही संघाने आक्रमण सुरू ठेवत आपल्या गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. मुंबई शहरच्या पायल कांचन, श्रृतिका शिंदे यांच्या आक्रमणाला उपनगरकडे तोड नव्हती. उपनगरच्या सई ताम्हाणेकर हिने काही पकडी घेत मुंबईला थोडाफार प्रतिकार केला.

किशोरी ब गटात नंदुरबारने बीड संघाचा ६३-२९ असा फडशा पाडला. विश्रांतीलाच ३२-९ अशी आघाडी घेणाऱ्या नंदुरबारने आपल्या आक्रमणाची धार कायम राखत ३४ गुणाच्या मोठ्या फरकाने सामना आपल्या बाजुला झुकविला. वैष्णवी देवकाते, अनुष्का झेंडे यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बीडची प्रतिक्षा जाधव चमकली.
किशोर विभागात अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग गटात लातूरने बलाढ्य अशा मुंबई उपनगर पश्चिम संघाला चकवले. रुद्र सारोळ, रितेश चव्हाण, आदित्य बने लातूरकडून तर स्वरूप बाईत, संदिप विश्वकर्मा, उमाशंकर वर्मा उपनगर कडून उत्कृष्ट खेळले.
नंदुरबार संघाने मुंबई शहर पश्चिम संघाला नमवत आगेकूच केली. सुदर्शन अडकित्ते, निलेश पाटील यांच्या झंजावाती चढाया व संभव बनकर, शंतनु म्हस्के यांच्या पकडीमुळे नंदुरबारला हा विजय सोपा गेला. मुंबई शहर पश्चिम कडून आयुष कनोजिया, जैयस्वर संतराम, जयकिशन चौहान यांनी बऱ्या पैकी प्रतिकार केला.
ब गटात पुणे शहर संघाने सोलापूर संघाचा पाडाव केला. कार्तिक तरडे व श्रेयश सुरवसे यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला. सोलापूर संघाचा अथर्व सोनार चमकला.



