आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघातील निवड निश्चित
नवी दिल्ली ः जन्मतःच दोन्ही हातांशिवाय जन्मलेली, पण असामान्य जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करणारी पैरा तिरंदाज शितल देवी यांनी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. येत्या जेद्दा येथे होणाऱ्या आशिया कप – टप्पा ३ स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय सक्षम ज्युनियर संघात शितलने स्थान मिळवत नवा कीर्तिमान रचला आहे.
सामान्य खेळाडूंमध्ये स्पर्धा करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवणाऱ्या शितलची ही कामगिरी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेची आणि प्रबळ इच्छाशक्तीची साक्ष देते. विश्व कंपाउंड चॅम्पियन असलेल्या शितलसाठी सक्षम तिरंदाजांमध्ये निवड होणे हा प्रेरणादायी मैलाचा दगड आहे.
शितलने संघाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत लिहिले की, “जेव्हा मी स्पर्धा सुरू केली, तेव्हा सक्षम तिरंदाजांसोबत स्पर्धा करणे हे माझे एक छोटेसे स्वप्न होते. सुरुवातीला अपयश मिळाले; पण प्रत्येक अपयशातून शिकत मी पुढे जात राहिले आणि आज ते स्वप्न सत्यात उतरायला एक पाऊल उरले आहे.”तुर्कीच्या पॅरिस पॅरालिंपिक विजेत्या ओजनूर क्यूर गिर्डी यांच्याकडून शितलने प्रेरणा घेतली आहे. क्यूर गिर्डी या सक्षम व पैरा दोन्ही गटांत भाग घेत यशस्वी झालेल्या आदर्श तिरंदाज आहेत.
सोनीपत येथे पार पडलेल्या चार दिवसीय राष्ट्रीय निवड चाचणीत ६० हून अधिक सक्षम तिरंदाजांमध्ये मुकाबला करत शितलने उत्तुंग क्षमता सिद्ध केली. ७०३ गुण (पहिल्या फेरीत ३५२ व दुसऱ्या फेरीत ३५१) मिळवत ती क्वालिफिकेशनमध्ये अव्वल तेजल साळवे इतक्याच गुणांनी बरोबरीत राहिली. अंतिम क्रमवारीत तेजल साळवे (१५.७५) आणि वैदेही जाधव (१५) नंतर शितल ११.७५ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वरी गडाधे हिला तिने केवळ ०.२५ गुणांनी मागे टाकले.
भारतीय संघ
रिकर्व ः पुरुष : रामपाल चौधरी, रोहित कुमार, मयंक कुमार
महिला : कोंडापावुलुरी युक्ता श्री, वैष्णवी कुलकर्णी, कृतिका
बिचपुरिया
कंपाउंड ः पुरुष : प्रद्युमन यादव, वासु यादव, देवांश सिंह
महिला : तेजल साल्वे, वैदेही जाधव, शितल देवी
शितलचा हा प्रवास प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी संदेश देणारा आहे – मर्यादा शरीरात असतात, पण क्षमतांची मर्यादा मन घालते! अखंड जिद्द, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने शितलने सिद्ध केले की परिस्थिती नव्हे, तर मनाची ताकदच खरी विजयी बनवते.



