ठाणे ः ओमानमधील कतार येथील एएमएम स्पोर्ट्स अरेना येथे नुकत्याच पार पडलेल्या ओमान ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दोन रौप्य पदकांची कमाई करत ठाणे व भारताचा झेंडा उंचावला आहे.
लागोपाठ चौथ्या वर्षी ही स्पर्धा भव्य प्रकारे आयोजित केली गेली व त्यात भारतासह इंडोनेशिया, दुबई, इतर आखाती देश, अमेरिका, इंग्लंड या देशांमधील अनेक नामांकित खेळाडूंना निमंत्रित केले होते.
पुरुष दुहेरी गटात प्रतीक रानडे आणि दीप रांभिया या ठाणेकर जोडीने दमदार खेळ सादर करत रौप्य पदक पटकावले, तर मिश्र दुहेरी गटात दीप रांभिया आणि सोनाली मिरखेलकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आणखी एक रौप्य पदक मिळवले.
मिश्र दुहेरी उपांत्य फेरीत दीप रांभिया आणि सोनाली मिरखेलकर यांनी इंडोनेशियाच्या अँडी आणि नुरानी या जोडीवर २२-२०, २१-१२ अशा गुणसंख्येने विजय मिळवला. अंतिम सामन्यात त्यांनी बेग्स आणि रीम (यूके) विरुद्ध रोमांचक लढत दिली, मात्र २१-२३, १९-२१ अशा फरकाने त्यांना थोडक्यात पराभव स्विकारावा लागला.
दीप रांभिया आणि प्रतीक रानडे ही जोडी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये अनेक वर्षे एकत्र प्रशिक्षण घेत असून, त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकून अकॅडमीच्या गौरवशाली परंपरेला नवा उजाळा दिला आहे.
विशेष म्हणजे, दीप रांभिया आणि सोनाली मिरखेलकर यांनी २०२५ मध्येही राष्ट्रीय क्रमवारीत आपले क्रमांक १ चे स्थान कायम राखले आहे, ज्यामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा लौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ठाणे बॅडमिंटन अकादमीचे योजना प्रमुख श्रीकांत वाड, ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे तसेच सर्व प्रशिक्षकांनी देखील या खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


