महाराष्ट्राच्या विश्वविजेत्यांना शासनाकडून प्रत्‍येकी २.२५ कोटींचे बक्षिस

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 126 Views
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मान

सपोर्टिंग स्टाफसाठी प्रत्येकी ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा

मुंबई ः ऐतिहासिक विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱया महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांचा या अद्वितीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी रोख २.२५ कोटी रुपयांचा धनादेश देऊन शुक्रवारी गौरविण्यात आले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते शाल, भेटवस्‍तू व धनादेश देऊन स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांच्‍यासह ऐतिहासिक विश्व विजयाचे शिल्पकार भारतीय संघाचे क्रीडा मार्गदर्शक अमोल मुझुमदार यांचा रोख २२.५० लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री अ‍ॅड माणिकराव कोकाटे, मंत्री, माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार मंत्री, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

वैयक्‍तिक क्रिकेटपटूंना सर्वाधिक रक्‍कम देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्‍य ठरले आहे. याप्रसंगी क्रिकेट संघाच्या सपोर्टिंग स्टाफसाठी प्रत्येकी ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वरिष्ठ स्तरावरील हा पहिलाच आयसीसी विश्वचषक विजय असून, या देदीप्यमान यशामुळे जागतिक स्तरावर भारताचा व पर्यायाने महाराष्ट्र राज्याचा गौरव झालेला आहे. असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्‍हणाले की  महिला विश्वचषक विजेत्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला सन्मान सोहळा हा केवळ एक अभिनंदनपर कार्यक्रम नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण आणि वाढत्या भूमिकेची अधिकृत नोंद आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्ज, राधा यादव आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्य देशाच्या क्रीडा नकाशावर आपला ठसा निश्चितपणे उमटवत आहेत.  

राज्याने दिलेले २.२५ कोटी रुपयांचे भव्य आर्थिक प्रोत्साहन अत्यंत स्तुत्य आहे आणि महिला क्रीडा क्षेत्रातील आर्थिक असमानता दूर करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे महिला खेळाडूंना व्यावसायिक सुरक्षितता मिळण्यास मदत होईल आणि पुढील पिढीला खेळात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उजळवणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध असल्‍याची क्रीडामंत्री अ‍ॅड माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *