छत्रपती संभाजीनगर ः भारतीय हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त “One Nation. One Game. One Celebration.” या घोषवाक्याखाली देशभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, मिलिंद महाविद्यालय परिसरात भव्य सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून झाली, तर समारोप ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाला, ज्याचा १५० वर्षांचा गौरवही या सोहळ्यात करण्यात आला.
राष्ट्रीय शतकपूर्ती सोहळ्यात देशभरातून १६०० सामने खेळवले गेले आणि ५७,६०० खेळाडूंच्या सहभागाने हा एक जागतिक विक्रम ठरला. या सोहळ्याचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ हॉकीपटूंचा सन्मान करण्यात आला. हॉकी स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य शिवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
सोहळ्यात निमंत्रित सामन्यांमध्ये मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने रेजिमेंटल हायस्कूलवर २–० विजय मिळवला तर मुलांच्या गटात बी बी चव्हाण मिलिटरी स्कूल ने रेजिमेंटल हायस्कूलवर २–१ अशी दमदार कामगिरी केली.
सोहळ्याचे संयोजन श्यामसुंदर भालेराव, अकबर खान, संजय तोतावाढ, समीर शेख यांनी केले, तर मान्यवर उपस्थितीत हॉकी महाराष्ट्राचे संयुक्त सचिव पंकज भारसाखळे, माजी महापौर अशोक सायना यादव, उद्योजक दिनेश गंगवाल, प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी यांचा समावेश होता.

पंच म्हणून अकबर खान, शेख इमरान, शेख समीर, शेख रिजवान, सईदा अंजुम, नाजुका मोहिते, पुनम वाणी, प्रियंका वाहूळ, विशाखा साळवे, शर्मा, श्रुती विधाते यांनी काम पाहिले.
हा सोहळा छत्रपती संभाजीनगरमधील हॉकीप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून, राष्ट्रीय खेळ हॉकीच्या गौरवशाली परंपरेला नवी ऊर्जा दिली आहे.
सन्मानित खेळाडू
समशेर शेख, किशोर परदेशी, अब्दुल बारी, शेख वजीर, रफिक शेख, संजय आडणे, कपिल भोजने, उज्वला सातदिवे, मोहम्मद शेख, राजेश पाटील, साजिद शेख आणि रियाज खान.
विशेष सन्मान
हॉकी इंडियाच्या टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्त सईदा अंजुम शेख आणि भारतीय रेल्वेतून स्पोर्ट्स कोट्यातून निवड झालेल्या मोहित कठोते यांचा विशेष गौरव करण्यात आला.


