छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथील न्यू हायस्कूलच्या अवंतिका रामकृष्ण केवटने राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवला आहे. ६९ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अरुणाचल प्रदेशमधील ईटानगर येथे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाली.ॉ
अवंतिका केवटने महाराष्ट्र राज्य संघाचा बहुमान वाढवत उत्कृष्ट प्रदर्शन करत ५ फेऱ्यांमध्ये आपला सुवर्ण पराक्रम दाखवला आणि राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. या यशासह, अवंतिका महाराष्ट्रातील २०२५-२६ वर्षातील शालेय बॉक्सिंगमध्ये पहिली महिला विजेती ठरली.
छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, तसेच डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार चंद्रकांत खैरे, सचिव नील पाटील, शहर सचिव पंकज भारसाखळे, क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे, दादाराव पखे, अरुण भोसले पाटील, महेश सकपाळ, लक्ष्मण कोळी, निलेश माने, अक्षय सोनवणे, सचिन काळे व अजय जाधव यांनी अवंतिकाचे अभिनंदन केले.
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले की, “अवंतिकाचे हे यश केवळ तिच्या मेहनतीचे फळ नाही, तर छत्रपती संभाजीनगरच्या शालेय क्रीडा संस्थांमधील सातत्यपूर्ण प्रयत्नाचे प्रतीक आहे.”
अवंतिका केवट हिने आपल्या यशाबद्दल सांगितले, “मी माझ्या प्रशिक्षक, शिक्षक आणि कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानते. हा सुवर्ण पदकाचा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय राहील.”
या यशाने स्थानिक शालेय क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागाला नवी उर्जा दिली असून, येत्या काळात अधिकाधिक मुली बॉक्सिंग सारख्या खेळांमध्ये स्वतःची चमक दाखवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


