दुहेरीत हीत कंडोरिया व विराज चौधरी, पर्णिता वट्टप्रंबिल व क्रिशिका गौतम यांना विजेतेपद
छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेने झालेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात दिल्लीच्या अर्श कथुरिया याने तर, मुलींच्या गटात आंध्रप्रदेशच्या हर्षा ओरुगंती यांनी विजेतेपद संपादन केले.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये अंतिम फेरीत मुलांच्या गटात दिल्लीच्या सहाव्या मानांकित अर्श कथुरियाने सोळाव्या मानांकित पुण्याच्या स्मित उंद्रेचा ६-४, २-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम सामन्यात आंध्रप्रदेशच्या अकराव्या मानांकित हर्षा ओरुगंतीने तमिळनाडूच्या दीप्ती व्यंकटेशनचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दुहेरीत मुलांच्या गटात गुजरातच्या हीत कंडोरियाने दिल्लीच्या विराज चौधरीच्या साथीत अव्वल मानांकित कर्नाटकच्या पुनीत एम व आंध्रप्रदेशच्या कौस्तुभ सिंग यांचा ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात आंध्रप्रदेशच्या पर्णिता वट्टप्रंबिल व क्रिशिका गौतम यांनी अव्वल मानांकित कर्नाटकच्या पद्मा रमेशकुमार व ओडिशाच्या शजाफा के यांचा ६-३, ५-७, ११-९ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
पारितोषिक वितरण सोहळा
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) आणि एमएसएलटीएचे कार्यकारी सदस्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, पीपी-सीबीआय अरविंद कुमार, एमएसएलटीएचे सीईओ मनोज वैद्य, आयटीएफ पर्यवेक्षक वैशाली शेकटकर, एंड्युरन्सचे उपाध्यक्ष संतोष झवर, एंड्युरन्स ग्रुपचे कॅप्टन के कवी, आर डी पवार, अभिनव मिश्रा, अॅड आशुतोष मिश्रा, रामय्या कोंकट्टी, प्रवीण गायसमुद्रे आणि टीम ईएमएमटीसी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.



