सोलापूर ः वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत महिलांच्या ४५ वर्षांपुढील गटात सोलापूरच्या संध्याराणी बंडगर हिने दुहेरी मुकुट संपादला.
इंदूर लॉन टेनिस संघटनेतर्फे अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेत संध्याराणीने एकेरीच्या अंतिम सामन्यात बंगळुरूच्या भाग्या अव्यावूचा ६-१, ६-२ असा पराभव केला. तसेच तिने मिश्र दुहेरीत नरेंद्र चौधरी यांच्या साथीत भाग्या व परमार या जोडीचा ६-२,६-२ असा पराभव केला. त्याच बरोबर महिलांच्या दुहेरी गटात त्यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांच्या हस्ते व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव अनिल धुप्पर यांच्या प्रमुख उपस्थितीत चषक बहाल करण्यात आला. तिचे सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी व मानद सचिव राजीव देसाई यांनी अभिनंदन केले.



