आयसीसीच्या नव्या नियमामुळे पाकिस्तानची आशा क्षीण
नवी दिल्ली ः भारत–पाकिस्तान सामन्याची चाहूल लागली की क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचतो. मग तो आशिया कप असो वा आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा. मात्र, २०२८8 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामन्याला समावेश झाल्यानंतरही, भारत–पाक सामना पाहायला मिळण्याची शक्यता अतिशय कमी झाली आहे. आयसीसीने निश्चित केलेल्या नव्या पात्रता निकषांमुळे पाकिस्तानसमोर कठीण प्रसंग उभा राहिला आहे.
नव्या नियमानुसार ऑलिम्पिक क्रिकेटची पात्रता कशी ठरेल?
दुबईत झालेल्या अलीकडील आयसीसी बोर्ड बैठकीत स्पष्ट करण्यात आले की पुरुष व महिला अशा दोन्ही गटांमध्ये केवळ सहा संघ खेळणार आहेत. विशेष म्हणजे, संघांची निवड टी-२० रँकिंगनुसार नव्हे, तर खंडनिहाय प्रतिनिधित्व या तत्त्वावर होणार आहे.
प्रत्येक खंडातून एक संघ आणि सहावा संघ ग्लोबल क्वालिफायरद्वारे या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे आशियातून फक्त एकाच संघाला थेट प्रवेश. सध्या टी-२० मध्ये क्रमांक १ असलेल्या भारताला हा ‘डायरेक्ट स्पॉट’ मिळणार हे स्पष्ट आहे.
पाकिस्तानला त्यामुळे थेट प्रवेश मिळण्याचे स्वप्न जवळपास अशक्य झाले असून, ग्लोबल क्वालिफायर जिंकण्यावाचून पर्याय नाही. अन्यथा आयसीसीने नियम बदलून आशियातून दोन संघ द्यावे लागतील – परंतु त्याची शक्यता अत्यल्प आहे.
संभाव्य सहा संघ (सध्याच्या परिस्थितीनूसार)
आशिया – भारत
ओशिनिया – ऑस्ट्रेलिया
युरोप – इंग्लंड
आफ्रिका – दक्षिण आफ्रिका
अमेरिका – (यजमान) अमेरिका
ग्लोबल क्वालिफायर – वेस्ट इंडिज/पाकिस्तान/इतर
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची नवी सुरुवात
१२ जुलै २०२८ पासून सुरू होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये एकूण २८ क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत. पुरुष व महिला या दोन्ही गटात टी-२० स्वरूपात स्पर्धा होणार असून, इतक्या मोठ्या क्रीडा महोत्सवात क्रिकेट प्रथमच समाविष्ट होत आहे.
आयसीसीच्या निवेदनानुसार, “एलए २०२८ मध्ये पुरुष आणि महिला टी-२० स्पर्धा असतील आणि दोन्ही मिळून २८ सामने खेळवले जातील.”
पाकिस्तानसमोर कठीण आव्हान
एकेकाळी टी-२० मध्ये दिग्गज मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानची सध्याची कामगिरी खंडातही अव्वल समजली जात नाही. त्यांचा ऑलिम्पिक प्रवेश आता पूर्णतः ग्लोबल क्वालिफायरमधील कामगिरीवर अवलंबून आहे.
पाकिस्तानसमोरची आव्हाने
आशिया खंडातून भारताशी थेट स्पर्धा अशक्य, फॉर्म, रँकिंग आणि संघ रचनेतील अस्थिरता, ग्लोबल क्वालिफायरमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान यांच्याशी कडवी लढत
जर नियम बदलले नाहीत, तर २०२८ ऑलिम्पिकमध्ये भारत–पाक सामना होण्याची शक्यता अतिशय क्षीण आहे. क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमनाची चाहूल उत्साहवर्धक असली, तरी चाहत्यांची सर्वाधिक उत्सुकता वाढवणारा ‘भारत–पाक’ थरार मिळणे कठीणच दिसते.



