राज्य बॉल बॅडमिंटन स्पर्धा पुणे जिल्हा संघाने जिंकली

  • By admin
  • November 9, 2025
  • 0
  • 64 Views
Spread the love

हिंगोली संघाला उपविजेतेपद, गार्गी मालवटकर सर्वोत्तम खेळाडू 

मलकापूर ः ७०व्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. हिंगोली संघाने उपविजेतेपद संपादन केले. 

यशोधाम पब्लिक स्कूल, बुलडाणा यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ७० वी महाराष्ट्र राज्यस्तरीय मुलींची बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान जल्लोषात पार पडली. राज्यातील २८ जिल्हा संघांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे आमदार चैनसुख संचेती, तर अध्यक्षस्थानी यशोधाम पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ वैभव महाजन उपस्थित होते. राज्य संघटनेचे अध्यक्ष पी के पटेल, महासचिव अतुल इंगळे, बंडूभाऊ चवरे, सरपंच शुभम काजळे, शैलेंद्र राजपूत, जिल्हा सचिव विजय पळसकर, प्रदीप तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिस्तबद्ध पथसंचलन, आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी संदेश यांनी उद्घाटन सोहळ्याला देखणे रूप लाभले.

आमदार  संचेती यांनी बॉल बॅडमिंटन खेळाला पुन्हा ५ टक्के क्रीडा आरक्षण व शिवछत्रपती पुरस्कार पात्रतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. डॉ. वैभव महाजन यांनी खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सुहास चवरे हे होते.

७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महाजन, प्राचार्या पी उषा, मनीष लखानी, कोमल तायडे, लक्ष्मीशंकर यादव, राजू पाटील, जिल्हा सचिव विजय पळसकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 

स्पर्धेचे यशस्वी आयोजन यशोधाम पब्लिक स्कूलच्या शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी केले. पंच म्हणून श्रीराम पवार, मनीष इंगोले, सागर भुरे, शरद पिलय, आदित्य सोळंके, अशोक बिजवे, क्रिश जैस्वाल, माडा स्वामी, गणेश टीमटाळे यांनी काम पाहिले.

अंतिम निकाल

प्रथम – पुणे जिल्हा

द्वितीय – हिंगोली जिल्हा

तृतीय – पुणे महानगर व लातूर

‘स्टार ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार हिंगोलीच्या गार्गी मालवटकर हिने पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *