पुरुष एकेरीत सुमित नागल याला, तर दुहेरीत रामकुमार रामनाथन व दिविज शरण यांना विजेतेपद
पुणे ः भारत पेट्रोलियमतर्फे ४४व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत प्रौढ गटात राज कुमार दुबेने एकेरी, दुहेरी व सांघिक गटात तीनही गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष एकेरीत सुमित नागल याने, तर दुहेरीत रामकुमार रामनाथन व दिविज शरण या जोडीने विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित आयओसीएलच्या सुमित नागल याने आयओसीएलच्या रामकुमार रामनाथनचा ९-६ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
पुरुष दुहेरीत अंतिम लढतीत आयओसीएलच्या रामकुमार रामनाथन याने दिविज शरणच्या साथीत ओएनजीसीच्या विष्णू वर्धन व व्हीएन रणजीत यांचा ८-७ (१०-८) असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
प्रौढ गटात एकेरीत अंतिम सामन्यात अव्वल मानांकित बीपीसीएलच्या राज कुमार दुबेने आयओसीएलच्या पंकज गंगावारचा ८-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत याच गटात बीपीसीएलच्या राज कुमार दुबे व मुनेश शर्मा या जोडीने एचपीसीएलच्या अनुप टोपो व सुखविंदर सिंग यांचा ८-१ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक आणि पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएसपीबीचे सल्लागार ललित वत्स, बीपीसीएलचे एचआर विभागाचे संचालक राज कुमार दुबे, बीपीसीएलचे क्रीडा विभागाचे सर व्यवस्थापक दिपक जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री जे शिवा कुमार रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.



