मुंबई ः भानवे अकादमी, एसआईइएस अकादमी, सत्यम संघ यांची कुमारी गट तर नवरत्न मंडळ यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन (पूर्व व पश्चिम) जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
चेंबूर क्रीडा केंद्र संघाला मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठताना “सुवर्ण चढाई” पर्यंत लढत द्यावी लागली. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने गजानन क्रीडा मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पार्ले येथील प्ले ग्राऊंड वर सुरू झालेल्या पूर्व विभागातील कुमार गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत चेंबूरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने “सुवर्ण चढाईत” कांजूरच्या सत्यम संघाला ३४-३३ असे चकवित उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
चेंबूर क्रीडा केंद्राने पूर्वार्धातील ०४-२० अशा पिछाडीवरून पूर्ण डावात २७-२७ अशी बरोबरी साधली. ५-५ चढायांच्या डावात पुन्हा ६-६(३३-३३)अशी बरोबरी झाली. शेवटी सुवर्ण चढाईत चेंबूरकरांनी सत्यमच्या ऋग्वेद तोरसकरची पकड करीत संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. चिराग पाटील यतार्थ माने चेंबूर क्रीडा केंद्र कडून, तर ऋग्वेद तोरसकर, तेजस कुंभार सत्यम संघ कडून उत्कृष्ट खेळले.कुमार गटाच्या दुसऱ्या सामन्यात विक्रोळीच्या नवरत्न मंडळाने चुनाभट्टीच्या भानवे अकादमीला सहज पराभूत केले ते गौरव पाटील, पार्थ लकेश्री यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर. रिझवान शेख, हर्षित गुप्ता यांचा खेळ भानवे अकादमीचा पराभव टाळण्यात कमी पडला.
कुमारी गटात मात्र भानवे अकादमीने कुर्लाच्या विशाल स्पोर्ट्स संघाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्राजक्ता राजवाडे, अनुष्का कनोजिया यांच्या चढाई पकडीच्या हा विजय सोपा केला. पराभूत संघाकडून अनुष्का सिंग, नम्रता शिवगण बऱ्या खेळल्या. कांजूरच्या सत्यम सेवा संघाने चेंबूरच्या बालवीर मंडळावर मात केली. आरती पवार, दर्शना घाडीगांवकर यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. बालवीरच्या तृप्ती बंडवे, समीक्षा पाटील यांनी कडवी लढत दिली. कुर्ल्याच्या एसआईइएस अकादमीने राऊडी स्पोर्टस् चा धुव्वा उडविला. आस्था सिंग, निशा रमण यांच्या झंझावती खेळाने ही विजयाची किमया साधली. राऊडी संघाची गौरी कारंडे चमकली.



