छत्रपती संभाजीनगर ः बाली, इंडोनेशिया येथे १ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झालेल्या आठव्या वर्ल्ड वोविनाम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातील सहा खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये आसामच्या पापू अहमद, राजू गोगोई आणि पापू भराली तसेच छत्तीसगडच्या गोपाल यादव यांनी उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा उंचावला. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा प्राप्त झाला.
दरम्यान, महाराष्ट्राची प्रगती शिंदे आणि मध्य प्रदेशचा साहिल बोरीवाल यांनीही उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत भारताचे प्रतिनिधित्व गौरवाने पार पाडले.
भारतीय खेळाडूंच्या या यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. फाउंडर प्रेसिडेंट व वर्ल्ड व्हाईस प्रेसिडेंट मास्टर डॉ विष्णू सहाई प्रेसिडेंट, वोविनाम इंडिया व सचिव, एशियन वोविनाम फेडरेशन मास्टर प्रवीण गर्ग, जनरल सेक्रेटरी, वोविनाम इंडिया शंकर महाबळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
भारतीय खेळाडूंच्या या यशामुळे देशातील वोविनाम खेळाडूंमध्ये उत्साह संचारला असून आगामी काळात अधिक भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदकं जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



