युवा क्रिकेटपटूंच्या मनोबल वृद्धीसाठी योगाभ्यासाचा आरंभ

  • By admin
  • November 9, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय

सोलापूर ः महाराष्ट्रात प्रथमच योग प्रशिक्षण आयोजित करुन सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सर्व क्रिकेटपटूंच्या मानसिक व भावनिक खंबीरतेसाठी योगाभ्यास सुरू करण्याचा निर्णय सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे एकमताने घेतला आहे.

या निर्णयाला अनुसरुन रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्टस व योग संस्थेच्या प्रधान संचालिका तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र संकुलातील ‘योग’ विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आणि गीता परिवारच्या सर्व कल्याण योग विभाग प्रमुख योगाचार्या संगीता सुरेश जाधव यांना नुकतेच असोसिएशनतर्फे आमंत्रित करण्यात आले होते. आरंभिक चर्चेनुसार क्रिकेटपटूंना क्रमशः टप्प्या टप्प्याने योगतंत्र शिकवण्याचे ठरले असून सुरुवातीला चौदा वर्षांखालील मुलांच्या संघाला व्यवस्थापक निलेश गायकवाड व पालकांच्या उपस्थितीत तत्काल “प्रारंभिक योग प्रशिक्षण” देण्यात आले.

राज्यातील पहिली क्रिकेट संघटना
संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर क्रिकेट असोसिएशनने हे पाऊल पहिल्यांदा उचलले असून त्यासाठी जिल्हा सचिव चंद्रकांत रेंबर्सू व १४ वर्षाखालील सिलेक्शन कमिटी चेअरमन राजेंद्र गोटे यांची एमसीएच्या वतीने व डिस्ट्रिक्ट चेअरमन रणजितसिंह मोहिते- पाटील, व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे, अध्यक्ष दिलीप माने, संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख, खजिनदार संतोष बडवे यांचेतर्फे प्रशंसा करण्यात आली आहे.

प्रारंभिक प्रशिक्षण
अतिशय वेगाने पण ठाम निर्णयाने आयोजित प्रारंभिक योग सत्रामध्ये सुरुवातीला जिल्हा सचिव चंद्रकांत रेंबर्सू व टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे यांनी संगीता सुरेश जाधव यांचे स्वागत केले. गोटे सरांनी परिचय करुन देत, एकाग्रता संदर्भात काही ऐतिहासिक प्रसंग सांगून विषयाचे प्रास्ताविक केले.

युद्ध व योगाचार्या संगीतादीदींनी मार्गदर्शन करताना कोणतीही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी मन व बुद्धीला का प्रशिक्षित करावे लागते. हे सोप्या भाषेत समजावून सांगून योगाभ्यासाचे महत्व परस्पर संवादातून विशद करत स्नायूंच्या लवचिकतेसाठी काही आवश्यक योग आसने करवून घेतली. त्यानंतर रक्ताभिसरण व प्राणक्रीयेचे विवेचन करत शास्त्रोक्त दीर्घ श्वसन क्रिया करुन घेतली. यानंतर सौम्य व तीव्र भस्त्रिका शिकवून भ्रामरी गुंजन तसेच ॐ कार नादध्वनीचे महत्त्व स्पष्ट करत कमीत कमी जागेत व कमी वेळात धारणेतून ध्यानाचा सराव करत या योगतंत्रांचा तत्काल अधिकाधिक लाभ  कसा करवून घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले.

योगाभ्यासाचे फायदे

१. मानसिक व भावनिक स्थिरता व एकाग्रतेसाठी

२. चंचलता नष्ट करुन तत्काल व योग्य निर्णय घेण्यासाठी

३. प्रसंगावधान राखून चिंता सोडून झटपट हालचाल करण्यासाठी

४. नैराश्य दूर करुन उत्साह वाढविण्यासाठी तसेच आळस झटकून अधिक आत्मविश्वासाने क्रियान्वित होण्यासाठी

५. भय, शीघ्रकोप पळवून लावून , शरीरांतर्गत ऊर्जा वाढवून त्वरित एकाग्रता साधून अधिक वेळ सक्रिय राहण्यासाठी

सदर योगतंत्र व प्रगत अभ्यास खेळाडूंना संतुलित, सफल व विजयी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असा अनुभव अनेक खेळाडूंसह कराटेपटूंना गेल्या पाच वर्षात शहर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत जिंकण्यासाठी व भारत देशाचे नाव  जागतिक क्रमवारीत उच्चस्थानी पोहोचवण्यासाठी तसेच हार जीत प्रसंगी मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आला असल्याचे कराटेपटू भुवनेश्वरी व अन्य खेळाडूंची उदाहरणे देत संगीता जाधव यांनी क्रिकेटपटूंच्या मनावर योगाभ्यासाचे महत्व बिंबवले.

भावी योजना- प्रज्ञासंवर्धन
ब्रह्मलीन योग व युद्धाचार्य सुरेश जाधव यांनी चाळीस वर्षांच्या अनुभव व योग साधनेतून ‘सर्व कल्याण योग – स्काय’ अंतर्गत तयार केलेला “प्रज्ञासंवर्धन योग” हा कमीत कमी वेळेत मन व बुद्धी संवर्धन तसेच ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढविणारा प्रगत प्राणायाम अभ्यास लवकरच सर्व वयोगटातील क्रिकेटपटूंना शिकवणार असल्याचे व महाराष्ट्रात प्रथमच असे मनाचे सामर्थ्य वाढविणारे योग प्रशिक्षण योग साधक मिहिर व संगीता जाधव यांच्या सहयोगाने देणार असल्याचे सचिव रेंबर्सू यांनी याप्रसंगी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *