सतीश-शिरीष यादव पित्रा-पुत्रांची ऐतिहासिक कामगिरी

  • By admin
  • November 9, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

गोवा येथे झालेल्या स्पर्धेत पटकावला दोघांनी आयर्नमॅन किताब 

छत्रपती संभाजीनगर ः शारीरिक आणि मानसिक क्षमता, जिद्द, शिस्त आणि प्रखर आत्मविश्वासाची अल्टीमेट कसोटी मानली जाणारी आयर्नमॅन ७०.३ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा गोवा येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक विलक्षण कामगिरी घडली – पिता–पुत्र या दोघांनीही आयर्नमॅन पूर्ण करत शहराचा मान अभिमानाने उंचावला आहे !

सिद्धार्थ जलतरण तलावचे प्रशिक्षित खेळाडू सतीश यादव आणि त्यांचा मुलगा शिरीष यादव या दोघांनी प्रखर जिद्द आणि तयारीच्या जोरावर ही कठीण स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शिरीष यादव याने १८ व्या वर्षी आयर्नमॅन बनण्याचा मान संपादन केला आहे. राष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू आणि डूअथलॉनमध्ये राष्ट्रीय पदक जिंकलेला शिरीष यादव आता १८ व्या वर्षी आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवतोय ही शहरासाठी मोठी अभिमानाची बाब. त्याने १.९ किमी पोहणे :३५:५४ मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर ९० किमी सायकलिंग ३:२८:५९ तासात पूर्ण केली. २१.१ किमी धावणे २:१४:३२ तासात पूर्ण केले. शिरीष यादवने एकूण वेळ ६:३०:२३ तास नोंदवत एक नवा इतिहास घडवला. 

सतीश यादव यांची जिद्दीची कहाणी
व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत कडक प्रशिक्षण घेणाऱ्या सतीश यादव यांनीही मुलासोबत स्पर्धा पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सतीश यादव यांनी १.९ किमी पोहणे हे अंतर ५९:३४ मिनिटे, ९० किमी सायकलिंग ३:५९:३१ तास आणि २१.१ किमी धावणे २:४५:०६ तासात पूर्ण करुन हा किताब मिळवला. त्यांनी एकूण वेळ ७:५७:२७ तास नोंदवली आहे. 

यामुळे यादव पिता–पुत्रांनी आयर्नमॅन ७०.३ फिनिशर म्हणून मिळवलेला मान केवळ क्रीडा क्षेत्रासाठी नव्हे तर शहरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

प्रशिक्षणाचा दृढ पाया
या यशात आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन तांत्रिक अधिकारी प्रमुख अभय देशमुख यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. सिद्धार्थ जलतरण तलावात झालेली दोघांची मूलभूत आणि तांत्रिक तयारी त्यांच्या कामगिरीत स्पष्ट दिसली.

क्रीडा क्षेत्रातून कौतुकाची बरसात
छत्रपती संभाजीनगर जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, तसेच अशोक काळे, सचेंद्र शुक्ला, संदीप चव्हाण, प्रदीप बुऱ्हांडे, डॉ संदीप जगताप, माधव गौंड, रुस्तुम तुपे, रवींद्र राठी, अजय दाभाडे, निखिल पवार, अंजुषा मगर आदींनी दोघांचे अभिनंदन करीत उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

पिता–पुत्राने एकत्र स्वप्न बघणे, एकत्र प्रशिक्षण घेणे आणि एकाच दिवशी आयर्नमॅन फिनिश करणे -ही कहाणी फक्त क्रीडा यशाची नाही, तर कुटुंबातील प्रेरणा, एकोपा आणि “एकत्र जिंकण्याच्या” संस्कारांची आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी ही एक सुवर्णक्षणाची कहाणी असून अनेक तरुणांना शिस्त + सातत्य + जिद्द” यांची प्रेरणा देणारी आहे. आयर्नमॅनची शर्यत म्हणजे शरीराची नव्हे, तर मनाची लढाई आणि यादव पिता–पुत्रांनी ही लढाई जिंकून दाखवली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *