आमदार प्रवीण दरेकर अध्यक्षपदी, भरतकुमार व्हावल महासचिवपदी तर पंकज भारसाखळे उपाध्यक्ष
मुंबई ः महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आज मुंबईत गाठला गेला. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी, तर पुण्याचे भरतकुमार व्हावल यांची महासचिवपदी निवड झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे बॉक्सिंग विकासात मोलाची भूमिका बजावणारे पंकज भारसाखळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

ही निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व धर्मादाय उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या देखरेखीखाली पार पडली. दरेकर–कवळी पॅनलने प्रभावी कामगिरी करत मोठ्या बहुमताने या निवडणुकीत विजय मिळवला.
महाराष्ट्राला बॉक्सिंगमध्ये सर्वोच्च स्थानी नेणार – अध्यक्ष प्रवीण दरेकर
पदग्रहणानंतर आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, “राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बॉक्सिंग भवन’ उभारण्यात येईल. तसेच प्रत्येक तालुक्यात ‘बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रे’ सुरू करून ग्रामीण भागातील तरुणांना संधी दिली जाईल. युवक-युवतींना बॉक्सिंगद्वारे करिअरची दारे खुली करणे, हीच आमची खरी क्रीडानिती असेल.”
त्यांनी सर्व संघटना, प्रशिक्षक व क्रीडा कार्यकर्त्यांना एकत्र येऊन महाराष्ट्राला बॉक्सिंगमध्ये अग्रस्थानावर नेण्याचे आवाहन केले.
मराठवाड्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सर्स घडवणार – पंकज भारसाखळे

मराठवाड्यात बॉक्सिंगच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले भारसाखळे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर हे आज राज्यातील अग्रगण्य बॉक्सिंग केंद्र ठरले आहे. येथील सृष्टी साठे, शर्वरी कल्याणकर, ओवी अदवंत, रोहन टाक, गौरव म्हस्के, रफिक कादरी यांच्या यशामुळे राज्याचा अभिमान वाढला. आता मराठवाड्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर घडवणे हेच आमचे लक्ष्य आहे.”
त्यांच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा, ग्रामीण कॅम्प, महिला प्रशिक्षण सुविधा व स्कॉलशिप योजनांमुळे या विभागात बॉक्सिंगला नवी ऊर्जा मिळाली आहे.
दरेकर–कवळी पॅनलचा दणदणीत विजय
या निवडणुकीत एकूण ६० पैकी ४३ सदस्यांनी मतदान केले. त्यात पहिली फेरी–१५, दुसरी–१५ आणि तिसरी–१३, अशा टप्प्यांत ४१/४३ विजयासह दरेकर–कवळी पॅनल विजयी ठरले.
महत्त्वाच्या पदांवर निवड
अध्यक्ष : आमदार प्रवीण दरेकर (४३/४३)
उपाध्यक्ष : पंकज भारसाखळे, मुन्ना कुराणे, मिलिंद साळुंके, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, शेख गफार, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विजय सोनवणे (४२), विक्रांत खेडकर, निल पाटील, कॅप्टन शाहू बिराजदार.
महासचिव : भरत व्हावल, प्रशासकीय सचिव : महेश सपकाळ, कार्यकारी सचिव : शैलेश ठाकूर (४२/४३), कोषाध्यक्ष : मनोज पिंगळे (बिनविरोध)
विभागीय सचिव पदावर अरुण भोसले, मयूर बोरसे, मंगेश कराळे, संपत साळुंखे, विजयकुमार यादव व विजय गोटे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या नव्या नेतृत्वामुळे राज्यात बॉक्सिंग क्षेत्रात नवचैतन्य, व्यावसायिकता, आणि दीर्घकालीन धोरणात्मक विकासाला गती मिळणार असल्याचा क्रीडा विश्वाचा विश्वास आहे. ग्रामीण ते शहरी, मुलींपासून युवकांपर्यंत – सर्वसमावेशक बॉक्सिंगचा नवा युग महाराष्ट्रात सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची ही नव्या दमदार नेतृत्वाची कार्यकारिणी राज्यासाठी आगामी काळात सुवर्णकाळाची पायाभरणी करून जाईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.



