राष्ट्रीय समर आईस स्टॉक स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर ः येथील सात खेळाडूंनी राज्याचा मान वाढवत आग्रा (उत्तर प्रदेश) येथे २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय समर आईस स्टॉक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या खेळात छत्रपती संभाजीनगरातील खेळाडूंचा सातत्यपूर्ण वर्चस्व कायम राहिले असून राज्य संघात सर्वाधिक प्रतिनिधित्व जिंकण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
आईस स्टॉक हा खेळ उष्ण आणि हिवाळी अशा दोन्ही प्रकारांमध्ये खेळला जातो. मागील दोन वर्षांपासून या खेळाचा समावेश हिवाळी खेलो इंडिया स्पर्धेत तसेच हिवाळी युनिव्हर्सिटी स्पर्धेत करण्यात आला आहे.
महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मेधावी अमित फुटाणे, वेदांत विनोद साळवे, बिबीषण पंडितराव चव्हाण, रोहित रमेश राठोड, आदित्य विनोद राठोड, सुशील सुभाष पवार आणि सिद्धी सचिन काळे यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना संघटनेचे सचिव प्रणव तारे यांचे मार्गदर्शन लाभले. तर महाराष्ट्र आईस स्टॉक संघटनेचे अध्यक्ष महेश राठोड आणि सचिव अजय सर्वोदय यांनी संघातील निवडीबद्दल खेळाडूंना शुभेच्छा देत उज्ज्वल यशासाठी प्रोत्साहित केले.


