शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तसेच जिल्हा व शहर किकबॉक्सिंग संघटना यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आयोजित शालेय जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे ८ व ९ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. १४, १७ आणि १९ वर्षे मुले व मुली या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सुवर्णपदक विजेत्यांची जालना येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी राम मायंदे, जिल्हा व शहर किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिरकर, स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अनिल मिरकर, मनपा संयोजक रोहन टाक आणि रोहिदास गाडेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पंच म्हणून सुमित जाधव, विश्वदीप गिर्हे, राजश्री गाडेकर, सिद्धी संत्रे, समीक्षा मांजरमे, देव चालक, सृष्टी अकोलकर, केतकी अंगडी, सुमित तोडकर, प्रथमेश गरड, कौस्तुभ लोळगे, शेख रमशा, दत्तात्रय शिंदे आणि पायल शिंदे यांनी काम पाहिले.
स्पर्धेत १४ आणि १७ वर्षे वयोगटात किड्स किंगडम इंग्लिश स्कूलने प्रभावी वर्चस्व राखत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावली, तर १९ वर्षे गटात देवगिरी महाविद्यालयाने चमकदार कामगिरी करत बाजी मारली.
14 वर्षांखालील मुलांचे निकाल
किड्स किंगडम शाळेच्या सर्वेश भोले, मयूर कुमार, आर्यन म्हस्के, आयूष चोरडिया, आयुष भुसारे, सुशांत राठी आणि रुत्वीक कुलकर्णी यांनी पदक पटकावले. एंजल किड्स स्कूलच्या अंशुमन मिरकरने सुवर्णपदक मिळवले.
पब्लिक स्कूलच्या विदीत झिने, संस्कार बालक मंदिरच्या वेदांत वाघमोडे आणि एस अकॅडमीचा विवेन मगरे विजयी ठरले.
१७ वर्षांखालील मुलांमध्ये किड्स किंगडम, फ्रान्सेलियन, राजर्षी शाहू, देवगिरी कॉलेज, एमजीएम यांच्या खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली. यश बारबैले, प्रथमेश पंडित, आयुष चाटूपल्ले, अमित जाधव, रितेश चव्हाण, अलोक विश्वकर्मा आणि यशार्थ कडू यांनी प्रभावी विजय मिळवला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये ५२ ते ७५ किलो वजनी गटात जिजामाता कन्या विद्यालयाचे प्रणव बनकर, देवगिरी महाविद्यालयाचे सोहन बनसोडे आणि अनिरुद्ध पंडित तसेच डॉ. सौ. इंदिरा भास्कर पाठक महाविद्यालयाच्या विश्वास सुपेकर यांनी सुवर्णपदके पटकावली.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात किड्स किंगडमच्या ईश्वरी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, आरोही माठे, मंजिरी कणीस, जीविका जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच सेंट लॉरेन्स, मॉरल किड्स, होली क्रॉस, आरजेपी स्कूल, भास्कराचार्य इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी पदके संपादन केली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात किड्स किंगडमच्या कल्याणी माठे, आदर्शा मोकसे, भूमिका गुळवे, हितश्री देशमाने, साक्षी भारंडवाल, लालसर वर्मा यांनी चमकदार प्रदर्शन केले. शिवछत्रपती महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, राधाकृष्ण विद्यालय, यांचीही पदकांमध्ये प्रभावी नोंद झाली आहे.
या स्पर्धेने जिल्ह्यातील किकबॉक्सिंग प्रतिभेला व्यासपीठ मिळाले असून अनेक तरुण खेळाडूंना राज्य स्तरावर झेप घेण्याची संधी उपलब्ध झाली. आयोजक आणि पंचांच्या सहकार्यामुळे स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडली. पुढील विभागीय फेरीत छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करतील, असा विश्वास आयोजक अनिल मिरकर यांनी व्यक्त केला.


