​मानवत येथे अस्मिता लीग ॲथलेटिक्स स्पर्धा

  • By admin
  • November 10, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

१४ व १६ वर्षांची मुलींना सुवर्णसंधी

मानवत (जि. परभणी) ः मुलींच्या सबलीकरणासाठी आणि ॲथलेटिक्स क्षेत्रात उदयोन्मुख प्रतिभावंत शोधण्यासाठी केंद्र शासन, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि अखिल भारतीय ॲथलेटिक्स महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी अस्मिता लीग ॲथलेटिक्स स्पर्धा येत्या १६ नोव्हेंबर रोजी मानवत येथे पार पडणार आहे. ही माहिती केकेएम कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ पवन पाटील यांनी दिली.

देशभरातील मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धांचे आयोजन होत असून, त्याचाच एक भाग म्हणून मानवत येथे ही जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. एएफआय मान्यतेने, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आणि परभणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे १४ व १६ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ही स्पर्धा होणार आहे.

जिल्हास्तरातून विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना थेट राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची अनमोल संधी उपलब्ध होणार असून, प्रतिभावान मुलींना विशेष प्रशिक्षणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींना १ हजार, ५०० व ३०० रुपये रोख पारितोषिकांसह मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

स्पर्धेतील प्रमुख क्रीडा प्रकार

१४ वर्षे मुलींसाठी (ट्रायथलॉन गट A, B, C) : ६० मीटर धावणे, ५ मीटर लांब उडी, उंच उडी / १ किलो गोळा पाठीमागे फेक / ६०० मीटर धावणे, छोटा भालाफेक

१६ वर्षे मुलींसाठी : ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, उंच उडी, ५ मीटर लांब उडी, थाळीफेक, ३ किलो गोळाफेक, भालाफेक (१० मीटर रनवे)

स्पर्धेत विनामूल्य प्रवेश असून, परभणी जिल्ह्यातील शाळा, क्रीडा मंडळे, क्लब व अकॅडमींनी अधिकाधिक मुलींना सहभागी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजित काकडे, कैलास टेहरे व यमनाजी भाळशंकर यांनी केले आहे.

ऑनलाईन नोंदणी १३ नोव्हेंबरपर्यंत अनिवार्य असल्याचे सचिव डॉ माधव शेजुळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *