मुंबई ः मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या ४३व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिद्धार्थ मंडळ व श्री सिद्धिविनायक मंडळ यांनी अनुक्रमे पूर्व व पश्श्चिम विभागात कुमार गटात विजेतेपद पटकाविले.
गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंड वर ही स्पर्धा झाली. पूर्व विभागातील कुमारांच्या अंतिम सामन्यात मुलुंडच्या सिद्धार्थ क्रीडा मंडळाने घाटकोपरच्या ओवाळी क्रीडा मंडळावर ३८-३३ असा विजय मिळवीत जेतेपदावर आपले नाव कोरले.
पूर्वार्धात ११-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या सिद्धार्थने सामना संपायला ५मिनिटे असताना २७-२७ अशी बरोबरी साधली. नंतर अधिक आक्रमता दाखवीत ५गुणांनी विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले.अमरजीत राजभर, संकेत यादव यांच्या चढाई पकडीच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ओवळीच्या मंगेश गुरव, यश मोरे यांचा जोश उत्तरार्धात कमी पडला.
पश्चिम विभागातील कुमारांच्या अंतिम सामन्यात दहिसरच्या श्री सिद्धिविनायक संघाने यजमान पार्ले महोत्सव स्पोर्टस् अकॅडमीचा ५६-३१ असा पराभव करीत जेतेपदाला गवसणी घातली. ओम कुदळे, हर्ष गुरव, साहिल जाधव यांनी सुरवातीपासुन आक्रमक खेळावर जोर देत पहिल्या डावात सिद्धिविनायकने ३५-०८ अशी भक्कम आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात सावध खेळ करणाऱ्या सिद्धिविनायक संघाला पार्ल्याच्या अभिषेक यादव, तनिष मांडवकर यांनी झुंजार खेळ करीत चांगलेच जेरीस आणले.
या अगोदर झालेल्या पूर्व विभागातील कुमारांच्या उपांत्या सामन्यात सिद्धार्थ मंडळाने मुलुंड क्रीडा केंद्राला तर ओवळी मंडळाने जय लहुजी मंडळाचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. पश्चिम विभागातील कुमारांच्या उपांत्य सामन्यात श्री सिद्धिविनायक संघाने हिड इंडियाचा, तर पार्ले महोत्सव स्पोर्ट्सने श्रीकृष्ण मंडळाचा पाडाव करीत अंतिम फेरी गाठली होती.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धा आयोजक मिलिंद शिंदे, समाजसेविका मनीषा शिंदे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, पुणेरी फलटणचे ट्रेनर संग्राम मांजरेकर, राष्ट्रीय खेळाडू राजेश आरोसकर यांच्या उपस्थितीत पार पडला.


