सिस्टर निवेदिता शाळेचा डॉजबॉल संघ दुसऱ्यांदा विजेता 

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

ठाणे ः भिवंडी मनपा कार्यक्षेत्रातील सिस्टर निवेदिता इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत मुंबई विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने विभागीय स्तरावर विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्यांदा शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे, तर १७ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला आहे. 


अंतिम सामन्यात भिवंडी मनपा संघाने रायगड संघाचा ९–५ अशा फरकाने पराभव करून दमदार विजय मिळवला. या विजयी संघात सिद्धेश वटनाला, अरुण तिवारी, आदित्य सिंह, करण प्रजापती, कृष्णा कोंडाळ, दक्षय माहेषुनी, आयुष यादव, विनीत गुप्ता, आयुष कुमार सिंग, सतीश गुप्ता या खेळाडूंचा समावेश होता. संपूर्ण संघाने एकजूट, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट खेळ सादर केला.

दरम्यान, १७ वर्षाखालील मुलांच्या गटातही सिस्टर निवेदिता शाळेच्या खेळाडूंनी तुफान कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. अटीतटीच्या सामन्यात मुंबई उपनगर जिल्हा संघाशी कडवी झुंज देत उपविजेतेपद मिळवले.

या संघात आदित्य यादव नैतिक केसरवाणी, रितेश कुशवाहा, आदेश वटनाला, प्रथम जाकेटीय, आर्यन मौर्य, रोहन हिंगणे, नारायणजी सिंग, सागर चामकूरा आणि आशिष कुमार प्रजापती या खेळाडूंचा समावेश होता.

या दोन्ही संघांच्या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू  नरेश राऊत व विनायक देवकर यांचे परिश्रम आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच खेळाडूंनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करून भिवंडीचे नाव राज्यभर उजळवले आहे.

शाळेच्या संस्थापक नीता गुप्ता, प्राचार्या अंकिता चौहान, ऐश्वर्या गुप्ता तसेच सर्व शिक्षकवर्गाने विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

भिवंडीचा अभिमान 
सिस्टर निवेदिता इंग्लिश हायस्कूलचा डॉजबॉल संघ सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेकडे वाटचाल करताना दाखवतोय की मेहनत, शिस्त आणि संघभावना यांचा संगम यशाची नवी कहाणी लिहितो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *