जयहिंद विद्यालय व केंद्रीय प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
छत्रपती संभाजीनगर ः परभणी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे के. के. महाविद्यालय, मानवत (जि. परभणी) येथे ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत बाभूळगावच्या जयहिंद विद्यालय व केंद्रीय प्राथमिक शाळेच्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
या स्पर्धेत बाभूळगावच्या पाच खेळाडूंनी राज्यस्तरीय पात्रता मिळवून विभागाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेत धनश्री गुजराणे (१७ वर्षांखालील मुली) हिने उंच उडी – प्रथम, ४०० मीटर हर्डल्स – द्वितीय असे यश संपादन केले. गायत्री जाधव (१७ वर्षांखालील मुली) हिने३ किलोमीटर वॉकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. आकांक्षा नरोडे (१९ वर्षांखालील मुली) हिने क्रॉस कंट्री धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. शारदा राऊत (१९ वर्षांखालील मुली): हिने १५०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादन केला. गीता आगवणे (७ वी, केंद्रीय प्राथमिक शाळा) हिने क्रॉस कंट्री स्पर्धेत ४ किमी धावणे प्रकारात पाचवे स्थान मिळवले.
जयहिंद विद्यालयाच्या आठ व केंद्रीय प्राथमिक शाळेच्या दोन खेळाडूंनी विभागीय स्तरावर सहभाग घेतला होता. त्यापैकी वरील पाच खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करून राज्य स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले.
राज्यस्तरीय स्पर्धा
ही राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धा १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान एस व्ही जे सी टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत हे पाचही खेळाडू छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मार्गदर्शन व अभिनंदन
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांचे समर्पक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शालेय क्रीडाक्षेत्रात बाभूळगावचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, मुख्याध्यापक पंकज बोरणारे, तसेच गणेश जाधव, लक्ष्मीकांत लिंभोरे, शैलेश भालेराव, अनिकेत तुपे, रिझवान शेख आणि अविनाश गायकवाड यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि सातत्याने बाभूळगावला मिळाला राज्यस्तरीय मान असे असे मत मुख्याध्यापक बोरणारे यांनी व्यक्त केले. तर क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांनी सांगितले की, “या स्पर्धेतील यशामुळे आमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि पुढील काळात अधिक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर झळकतील.”



