स्वराज्य स्पोर्ट्स, महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाला विजेतेपद 

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 27 Views
Spread the love

मुंबई उपनगर कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न 

मुंबई ः मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या ४३व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत स्वराज्य स्पोर्ट्स, महात्मा गांधी स्पोर्ट्स यांनी कुमारी गटात अनुक्रमे पूर्व व पश्चिम विभागात विजेतेपद पटकाविले. 

गजानन मंडळ व पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार पराग आळवणी, आयोजक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ले येथील प्ले-ग्राउंडवर हे सामने संपन्न झाले. पूर्व विभागातील कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात कांजूरच्या स्वराज्य स्पोर्ट्स संघाने कुर्ल्याच्या एसआयइएस संघाचा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

आंतरराष्ट्रीय खेळाडू सेरेना म्हसकरचा धुव्वादार खेळ तिला सानिया इंगळे, मधुरा सावंत यांची मिळालेली चढाई पकडीची साथ यामुळे स्वराज्य संघाने विश्रांतीला मोठी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर मात्र एसआयइएस संघाच्या आस्था सिंग, तनुश्री शिंदे यांनी आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली. पण संघाला विजेतेपद मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.

पश्चिम विभागातील कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात बांद्र्याच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाने मालाडच्या आकाश मंडळाला आरामात नमवत जेतेपदाचा चषक उंचावला. पूजा चिंदरकर, प्रतिक्षा सर्वसाने यांच्या चढाई पकडीच्या सर्वांगसुंदर खेळाला याचे श्रेय जाते. आकाशच्या तन्वी बारगुडे, शलाका मर्ढेकर बऱ्या खेळल्या. या अगोदर झालेल्या कुमारी गटाच्या पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्ट्स संघाने स्नेह विकासचा, तर एसआयइएस संघाने शिवकन्या मंडळाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. 

पश्चिम विभागातील कुमारी गटाच्या उपांत्य फेरीत महात्मा गांधी संघाने माऊली प्रतिष्ठानला, तर आकाश स्पोर्ट्स संघाने निवारा हिड इंडियाला नमवत अंतिम फेरीत धडक दिली होती.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ स्पर्धा आयोजक मिलिंद शिंदे, समाजसेविका मनीषा शिंदे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, यांच्या उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *