नागपूर जिल्हा युवक महोत्सवात तरुणाईचा जल्लोष 

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

शेकडो युवकांचा सहभाग

नागपूर ः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सव जल्लोषात पार पडला. ‘युवा शक्ती, नवा विचार’ या घोषवाक्याखाली भरविण्यात आलेल्या या महोत्सवात विविध जिल्ह्यांतील शेकडो युवक-युवतींनी सहभाग घेत आपल्या कला, संस्कृती आणि कौशल्याची उजळणी केली.

हा महोत्सव ११ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे पार पडला. उद्घाटन प्रसंगी प्रणाली राऊत, डॉ संभाजी भोसले, सचिन घोडे, प्रशांत शंकरपूरे, नम्रता शेट्टी, संजय दुधे, संध्या इंगळे, गौरव दलाल, प्रभारी क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक आदी मान्यवरउपस्थित होते. प्रभारी क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक यांनी मनोगतात सांगितले की, “युवकांच्या सृजनशीलता आणि ऊर्जा याला दिशा देण्यासाठी युवक महोत्सव हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.”

२५० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, शास्त्रीय गायन, चित्रकला, वाद्यवृंद, एकांकिका, भाषणकला, तसेच सामाजिक विषयांवर आधारित लघुनाट्य या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमधून सामाजिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि नशाबंदी यांसारखे विषय प्रभावीपणे मांडले गेले.

नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली. ग्रामीण भागातील युवकांचा उत्साही सहभाग लक्षवेधी ठरला.

विजेते ठरलेले कलाकार

परीक्षक मंडळाने स्पर्धांचे बारकाईने परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली. एकांकिका स्पर्धात विदर्भ महाविद्यालय, नागपूर प्रथम (७ हजार), महात्मा फुले कॉलेज, गोंदिया द्वितीय (५ हजार), तर यशवंतराव चव्हाण कॉलेज, भंडारा तृतीय (३ हजार) ठरले. लोकगीत स्पर्धात राजगुरू महाविद्यालय, वर्धा प्रथम, तर चंद्रपूर आणि नागपूर येथील संघांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. चित्रकला स्पर्धात नागपूरचे सतीश महाजन, गडचिरोलीच्या प्रियंका भोसले आणि वर्ध्याचे अमोल चौधरी विजेते ठरले. लोकनृत्य आणि वाद्यवृंद स्पर्धात रायगड, नागपूर आणि वर्ध्याच्या संघांनी चमकदार कामगिरी केली.

स्पर्धेसाठी तयारी
या महोत्सवातील सर्व विजेते आता राज्यस्तरीय युवक महोत्सव २०२५-२६ साठी पात्र ठरले असून पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या अंतिम टप्प्यात सहभागी होणार आहेत. त्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव

या युवक महोत्सवाने विदर्भातील युवकांना एकत्र आणून कला, संस्कृती आणि नवविचारांचा संगम घडविला. युवकांच्या ऊर्जेला सृजनशीलतेची नवी दिशा देणारा हा महोत्सव नागपूर विभागासाठी प्रेरणादायी ठरला असून, राज्यातील युवकांच्या सांस्कृतिक क्षमतेचा भक्कम पुरावा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *