ठाणे : ठाणे महानगरपालिका आयोजित ठाणे जिल्हा आंतरशालेय कराटे स्पर्धेत कानिनजुकू आर. जे. ठाकूर कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण आठ पदकांची कमाई केली असून त्यात ५ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
अकॅडमीतील विजेत्यांमध्ये शान पाटील (बी. एन. बांदोडकर कॉलेज), रुधा पाटील (डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे), प्रिशा सुवर्णा (श्री माँ बालनिकेतन, ठाणे), दृष्टी देसले (बी. एन. बांदोडकर महाविद्यालय), पूर्वा पालकर (बी. एन. बांदोडकर महाविद्यालय), तन्मय पालकर (सरस्वती विद्यालय, नौपाडा, ठाणे), आराध्या पाटील (आर. जे. ठाकूर ई. एम. स्कूल, ठाणे), ॲलिस अल्फोन्स (सेंट जॉन हायस्कूल, ठाणे) यांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकॅडमीच्या पाच सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड मुंबई विभागीय स्पर्धेसाठी झाली असून, या खेळाडूंकडून आता मुंबई विभागीय स्तरावर ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आणखी यश संपादन होण्याची अपेक्षा आहे.
या विजयानंतर विजेत्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये भव्य सत्कार करण्यात आला असून, शिक्षक, पालक आणि सहाध्यायी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ठाण्याचे हे युवा कराटेपटू आता विभागीय पातळीवर अधिक चमक दाखवण्यास उत्सुक आहेत.
या यशामागे अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सतीश पाटील यांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण महत्वाचे ठरले आहे. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सातत्यपूर्ण मेहनत घेऊन त्यांना तांत्रिक व मानसिकदृष्ट्या सक्षम केले.
यासोबतच अकॅडमीची सपोर्ट टीम – श्रेयश पाटील, सागर शिंदे, अंकिता चव्हाण, सिद्धी निकम, धनश्री देसले आणि युविका हेगडे यांनी देखील स्पर्धेच्या तयारीत अमूल्य सहकार्य केले.
सतीश पाटील म्हणाले, “या मुलांनी शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. पुढच्या स्तरावर ते ठाणे जिल्ह्याचं नाव अधिक उंचावतील, असा मला विश्वास आहे.”
ठाणे महानगरपालिकेच्या या स्पर्धेतून उदयास आलेले हे युवा कराटेपटू महाराष्ट्रातील कराटे क्षेत्रासाठी आशेचे नवे किरण ठरत आहेत.
