जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली उपक्रमांची माहिती
जळगाव ः जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे भेट देऊन विविध क्रीडा सुविधा आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांचे स्वागत केले आणि संकुलातील सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
भेटीदरम्यान सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी जलतरण तलावाची पाहणी केली. तलावाचे संचालन, व्यवस्थापन आणि वापराविषयी माहिती घेतल्यानंतर काही किरकोळ दुरुस्तीच्या सूचना देखील दिल्या. त्यानंतर बॅडमिंटन हॉलची पाहणी करताना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी येथे लवकरच टेरफ्लेक्स कोटचे काम होणार असल्याची माहिती दिली.

त्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ‘खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटर’ला भेट देऊन प्रशिक्षण सुविधा, उपकरणे आणि खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदक विजेत्या खेळाडूंशी थेट संवाद साधला. प्रशिक्षणाची पद्धत आणि आवश्यक सुविधा याबद्दल माहिती घेतली. खेळाडूंसाठी ‘आईसबाथ सुविधा’ निर्माण करण्याची सूचना त्यांनी दिली आणि सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रवींद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी घुगे यांना खेलो इंडिया योजना, प्रशिक्षण केंद्रांचे कार्य आणि स्पर्धांच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ४०० मीटर धावपट्टी व फुटबॉल मैदानाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. संकुलातील प्रेक्षक गॅलरी, व्यावसायिक गाळे आणि इतर बांधकामांची माहिती त्यांनी घेतली. संकुलाची रंगरंगोटी, तसेच मुख्य प्रवेशद्वार ते धावपट्टीपर्यंतचा रस्ता तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर टेबल टेनिस हॉल, व्यायामशाळा आदी विभागांची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. धावपट्टीचे काम सुरू असल्याने सॉफ्टबॉल जिल्हा प्रशिक्षण केंद्र सध्या एम जे कॉलेज येथे तात्पुरते सुरू असल्याची माहिती रवींद्र नाईक यांनी दिली. या प्रशिक्षण केंद्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी असून त्यांना क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी प्रशिक्षण देत असल्याची माहितीही देण्यात आली.
शेवटी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि अधिकाधिक खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल. या संकुलाचा व्यापक उपयोग व्हावा आणि जळगाव जिल्हा क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”
या पाहणी दौऱ्याद्वारे जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाल्याची भावना खेळाडूंमध्ये दिसून आली.



