छत्रपती संभाजीनगर ः नाशिक आडगाव येथील विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या पाचव्या पश्चिम विभागीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरची राजनंदिनी सतीश जाधव हिने उत्कृष्ट खेळ करून रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेत राजनंदिनीने महाराष्ट्र संघातून खेळताना गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा राज्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, आता तिची निवड आंतर-क्षेत्रीय राष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा १ व २ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे होणार आहे. राजनंदिनीच्या या कामगिरीमुळे संभाजीनगरच्या कराटे क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशिक्षक व पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


