सांघिक विभागात टॉस अकादमी संघाला अजिंक्यपद
पुणे ः प्रौढांच्या प्रमोद मुळ्ये स्मृती चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पराग जुवेकर व ओंकार जोग यांनी आपापल्या गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले तसेच त्यांचे सहकारी रवींद्र जोशी व सागर शहा यांना उपविजेतेपद मिळाले. सांघिक विभागात पुण्याच्या टॉस अकादमी संघाला अजिंक्यपद मिळाले
ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेने पीवायसी जिमखाना येथे आयोजित करण्यात आली होती.

पुरुषांच्या ६० वर्षावरील वयोगटात पाचव्या मानांकित पराग जुवेकर यांनी नागपूरच्या समीर हलदुले यांचा ८-११,११-६,८-११,११-८,१३-११ असा अटीतटीच्या लढतीनंतर पराभव केला तर ५५ वर्षावरील वयोगटात द्वितीय मानांकित प्रसाद नाईक (मुंबई महानगर जिल्हा) यांनी पुण्याच्या रवींद्र जोशी या अग्रमानांकित खेळाडूंना ११-५,८-११,११-९,११-५ असे पराभूत केले.
४५ वर्षावरील गटात ओंकार जोग यांनी मुंबई महानगर जिल्हा संघाच्या अग्रमानांकित केदार कसबेकर यांचा ११-६,११-५,११-७ असा पराभव केला तर ४० वर्षावरील वयोगटात नाशिकच्या अमोल सरोदे या द्वितीय मानांकित खेळाडूंनी पुण्याच्या सागर शहा यांना ११-७,११-८,११-८ असे पराभूत केले.
६५ वर्षांवरील वयोगटात नाशिकच्या उमेश कुंभोजकर या अग्रमानांकित खेळाडूंनी मुंबई महानगर जिल्हा संघाचे द्वितीय मानांकित खेळाडू जयंत कुलकर्णी यांचा १२-१०,१२-१०,११-२ असा पराभव केला. ५० वर्षावरील गटात मुंबई महानगर जिल्हा संघाच्या शरद ग्रोव्हर यांनी मुंबई उपनगर संघाचे खेळाडू तेजस नाईक यांच्यावर ६-११,११-८,११-८,७-११,११-८ अशी मात केली व विजेतेपद पटकाविले.
सांघिक विभागातील ४० वर्षावरील वयोगटात टॉस अकादमी संघाने अंतिम लढतीत स्मार्ट स्मॅशर्स संघाचा ३-१ असा पराभव केला त्यावेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत संतोष वाकराडकर यांनी सुहास राणे यांचा ११-६,११-८,५-११,११-२ असा पराभव केला मात्र ओंकार जोग यांना स्मार्ट संघाच्या केदार कसबेकर यांच्याकडून ६-११,७-११,११-९,९-११ असा पराभव पत्करावा लागला.
टॉस अकादमी संघाच्या दीपक कदम यांनी भावेश शहा यांना ११-९,११-७,११-६ असे पराभूत करीत पुन्हा आपल्या संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. निर्णायक लढतीत टॉस अकादमीच्या ओंकार जोग यांनी सुहास राणे यांच्यावर ११-२,११-७,११-५ अशी सहज मात केली आणि संघास अजिंक्यपद मिळवून दिले.


